फोटो सौजन्य - Social Media
पिझ्झा, बर्गर, समोसे, छोले-भटुरे यांची नावे ऐकताच जिभेला पाणी सुटते, पण या चविष्ट पदार्थांमुळे शरीरात नकळत प्रचंड कॅलरी जमा होतात आणि त्याचा दीर्घकालीन परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. अनेकदा आपण “थोडंच तर खाल्लंय” असा विचार करतो, परंतु हे ‘थोडं’ही आपल्या शरीराला जड पडू शकतं. याचा अर्थ असा नाही की आवडते पदार्थ कायमचे टाळावेत, मात्र त्यांचा आस्वाद घेतल्यानंतर त्या कॅलरी जाळण्यासाठी योग्य प्रमाणात शारीरिक हालचाल करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, २ समोसे (४३४ कॅलरी) खाल्ल्यानंतर अंदाजे १ तास ३७ मिनिटे चालावे लागते, १ प्लेट छोले-भटुरे (८८५ कॅलरी) साठी ३ तास १९ मिनिटे, २ पिझ्झा स्लाइस (६०० कॅलरी) साठी २ तास १५ मिनिटे आणि बर्गर (६५३ कॅलरी) साठी २ तास २७ मिनिटे चालावे लागते. लहान वाटणाऱ्या गोड पदार्थांमध्येही कॅलरी भरपूर असतात, २ गुलाबजाम (३०० कॅलरी) जाळण्यासाठी सुमारे १ तास ८ मिनिटे आणि आइसक्रीम बार (२४० कॅलरी) साठी ५४ मिनिटे चालावे लागते. यावरून स्पष्ट होते की चवदार स्नॅक्स खाल्ल्यानंतर त्यांना पचवण्यासाठी व्यायाम किंवा चालणे हे आवश्यकच आहे.
आरोग्य टिकवण्यासाठी ‘स्मार्ट स्नॅकिंग’ या सवयी अंगीकारणे महत्त्वाचे आहे. प्रथम, पॅकेटबंद स्नॅक्स घेताना फक्त कॅलरी नव्हे, तर घटकांची यादी वाचा. पहिल्या काही घटकांत साखर, रिफाइंड पीठ किंवा तेल असल्यास ते रोज न खाता कधीतरीच खावे. दुसरे, पोषणमूल्यांवर भर द्या, ताजे फळ, उकडलेले चणे, दही, भुईमूग, गाजर काकडीचे काप हे उत्तम पर्याय आहेत. तिसरे, खाण्याची मात्रा नियंत्रित ठेवा. थेट पॅकेटमधून न खाता छोट्या वाटीत घेऊन खा, त्यामुळे किती खातोय हे लक्षात राहते. चौथे, प्रोटीन किंवा फायबरयुक्त पदार्थांसोबत स्नॅक्स खा. अंडे, पनीर, दही, नट्स यामुळे जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते.
पाचवे, माइंडफुल ईटिंग करा. टीव्ही किंवा मोबाईल पाहत खाताना आपण नकळत जास्त खातो, त्यामुळे शांतपणे बसून खाण्याकडे लक्ष द्या. सहावे, वेळेची काळजी घ्या. रात्री उशिरा खाल्लेले स्नॅक्स चरबीच्या स्वरूपात साठण्याची शक्यता जास्त असते. आणि सातवे, खाण्यापूर्वी पाणी प्या. अनेकदा भूक नसून तहान लागलेली असते. थोडक्यात, पिझ्झा-बर्गर खाणं चुकीचं नाही, पण त्यानंतर पुरेसा व्यायाम, चालणे आणि स्मार्ट खाण्याच्या सवयी अंगीकारणं हीच खरी आरोग्याची गुरुकिल्ली आहे.