लोणचे (Pickle) शब्द उच्चारला तर डोळ्यासमोर आंबटगोड आंब्याचं लोणचं. लोणचं हा असा पदार्थ आहे ज्यामुळे जेवणाला एक वेगळीच चव देतं. अनेक जणांना जेवताना लोणचं खाण्याची सवय असते. आंबा, लिंबू, मिरचीचे लोणचं रोजच्या जेवणात पाहायला मिळतं. मात्र, तिखट आणि झणझणीत चव असणाऱ्या लसणाचं देखील लोणचं बाजारात मिळतं. अनेक जण जेवताना लसणाचं लोणचं खातात. हे लोणचं इतर लोणच्याप्रमाणे बनवण्यास देखील सोपं आहे. कसं ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घ्या चटपटीत झणझणीत लसणाचं लोणचं (Tasty Garlic Pickle ) कसं बनवतात.
तेल – अर्धी वाटी
मेथ्या १ चमचा
मोहरी – १ चमचा
बडिशोप – १ चमचा
कलौंजी – १ चमचा
कडीपत्ता – ८ ते १० पाने
लाल मिरच्या – ५ ते ६
लसूण पाकळ्या – २० ते २५
हळद – १ चमचा
लाल तिखट – अर्धा चमचा
व्हिनेगर – पाव वाटी
मीठ – चवीपुरते
पॅनमध्ये तेल चांगले गरम करुन घ्यावे.
यामध्ये मेथ्याचे दाणे टाकून ते थोडे लालसर होऊ द्यावेत.
त्यामध्ये मोहरी आणि कलौंजी घालून फोडणी तडतडू द्यावी.
यामध्ये लाल मिरच्या आणि कडीपत्ता घालावा, यामुळे लोणच्याला एकप्रकारचा चांगला स्वाद येतो.
मग यामध्ये लसूण पाकळ्या घालून हे सगळे एकजीव करुन घ्यावे.
नंतर यामध्ये हळद, तिखट आणि मीठ घालावे.
व्हिनेगर घालून साधारण २ मिनीटे सगळे शिजू द्यावे.
गार झाल्यावर हे लोणचे एका बाऊलमध्ये काढून ठेवावे.