आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया
आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया (IDA) मुळे थकवा, कमकुवतपणा, त्वचेचा फिकटपणा आणि श्वासोच्छवासाचा त्रास यासारखी लक्षणे उद्भवू शकतात. आयडीएचा त्रास कोणालाही होऊ शकतो, परंतु महिला, मुले आणि दुर्धर आजार असलेल्या व्यक्ती या सारख्या विशिष्ट गटांना जास्त धोका असतो.
प्रसार कमी करण्यासाठी आणि एकूणच आरोग्य सुधारण्यासाठी आयडीएची कारणे, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय समजून घेणे महत्त्वपूर्ण आहे. डॉ. कुणाल सहगल, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य पॅथॉलॉजिस्ट, न्यूबर्ग सहगल पथ प्रयोगशाळा यांनी अधिक माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)
IDA मुख्य कारण
आयर्न डेफिशियन्सी अॅनिमियाचे एक मुख्य कारण म्हणजे आहारात लोहाचे पुरेसे प्रमाण नसणे. लोह हे लाल मांस, पोल्ट्री, मासे, मसूर, बीन्स आणि फोर्टिफाइड धान्य यासह विविध पदार्थांमध्ये आढळणारे एक आवश्यक पोषक तत्व आहे. हेम लोहाच्या कमी उपलब्धतेमुळे शाकाहारी आणि वेगन असलेल्यांना आयडीए होण्याची शक्यता अधिक असू शकते, हा प्राण्यांमध्ये आढळणारा एक लोहाचा प्रकार आहे जो शरीरामध्ये सहजपणे शोषला जातो. याव्यतिरिक्त, काही आजार जसे की सेलियाक रोग, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिसऑर्डर आणि मासिक पाळी किंवा अंतर्गत रक्तस्त्रावामुळे रक्त मोठ्या प्रमाणात कमी होणे यामुळे लोहाच्या शोषणास अडथळा येऊ शकतो किंवा लोहाचे जास्त नुकसान होऊ शकते.
हेदेखील वाचा – शहरी भागातील महिलांमध्ये लोहाची कमतरता होण्याचे संकट, त्वरीत उपचार करणे आवश्यक
लक्षणे लवकर समजावी
लोहाच्या कमतरतेची लक्षणे
लवकर निदान आणि उपचारासाठी आयडीएची लक्षणे समजणे आवश्यक आहे. सामान्य लक्षणांमध्ये अत्यधिक थकवा, अशक्तपणा, फिकट किंवा पिवळी त्वचा, हृदयाचे अनियमित ठोके, श्वासोच्छवासाचा त्रास, चक्कर येणे, हात पाय गार पडणे आणि नखे ठीसुळ होणे यांचा समावेश आहे. मुलांमध्ये, आयडीएमुळे वाढ आणि विकासाचा वेग मंदावणे तसेच वर्तणुकीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. आपल्याला ही लक्षणे आढळल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे, जेणेकरून ते काही रक्तचाचण्या करायला सांगून त्रासाचे मूळ कारण काय हे पाहून निदान करू शकतात.
हेदेखील वाचा – ‘हे’ 6 पदार्थ लोखंडी कढईत बनवणं आहे शरीरासाठी घातक, कारण माहिती आहे का?
आहारात कशाचा समावेश
कोणता आहार खावा
लोहाच्या कमतरतेपासून बचाव करण्यासाठी आहारात लोहसमृद्ध पदार्थांचा समावेश असणे आवश्यक आहे. जास्त जोखीम असलेल्यांसाठी, लीन मिटस, हिरव्या पालेभाज्या, बीन्स आणि लोहयुक्त धान्य यासारख्या लोहयुक्त पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. लिंबूवर्गीय फळे आणि टोमॅटोसारख्या व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थांसह हे एकत्र सेवन केल्याने लोहाचे शोषण वाढू शकते. काही प्रकरणांमध्ये, विशेषत: असे लोक ज्यांना जास्त लोहाची गरज आहे किंवा शोषण समस्या असलेल्या व्यक्तींना डॉक्टर लोहपूरक आहार घेण्याचा सल्ला देऊ शकतात.
काय करावे
नियमित आरोग्य तपासणी आणि रक्त चाचण्यांमुळे आयडीए असल्याचे लवकर समजू शकते, ज्यामुळे त्वरित उपचार आणि व्यवस्थापन करणे शक्य होते. गर्भधारणा होऊ शकणाऱ्या वयातील महिला, गर्भवती महिला आणि दुर्धर आजार असलेल्या महिलांनी विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया आणि त्याच्या परिणामाबद्दल जागरूकता वाढवून, व्यक्ती त्यांचे आरोग्य सांभाळण्यासाठी सक्रिय पावले उचलू शकतात.
थोडक्यात, आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया: हा एक असा आजार आहे जो टाळता येऊ शकतो आणि त्यावर उपचार देखील करता येतात. जागरूकता वाढवून, आहारात बदल आणि नियमित वैद्यकीय सल्लामसलत करून, जोखीम कमी करून निरोगी जीवन जगणे शक्य आहे.