सुनेत्रा पवार शपथविधी टीकेवर भाजप चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिले (फोटो - सोशल मीडिया)
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकावल्यानंतर आता मिनी मंत्रालय देखील भाजपाच्या ताब्यात घेण्यासाठी शक्ती पणाला लावली आहे. काही ठिकाणी सोबत तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत आहे. असे असले तरी महायुतीच्या नेत्यांमध्ये मनभेद होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. संभाजीनगर महापौर पदावर कोण बसणार हे सोमवारी स्पष्ट होणार असल्याचे मत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत महायुती व्हावी अशी आग्रही भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होती. मात्र, बैठका होऊनही अखेर स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जात असल्याचे जाहीर करण्यात आले. संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी महसूल मंत्री बावनकुळे यांच्यावर सोपवण्यात आली होती. या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवून भाजपाचा महापौर बसवण्यात यश मिळवले. हे यश पाहता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचीही जबाबदारी बावनकुळे यांच्यावर सोपवली गेली. त्याच अनुषंगाने त्यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘संकल्पनामा’ पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात आला.
हे देखील वाचा : पर्यटन क्षेत्रासाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा! देशात १० हजार नवीन Tourist guide करणार तयार
यावेळी मंत्री अतुल सावे, आमदार संजय केणेकर, अनुराधा चव्हाण, शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, सुहास शिरसाठ, संजय खंबायते, अनिल मकरिये यांची उपस्थिती होती. ते बावनकुळे म्हणाले, “काही ठिकाणी सोबत आहोत तर काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढत आहोत. निवडणुकीनंतर त्यावर चर्चा करू. मनभेद होणार नाही त्याकडे लक्ष देऊ. आरोप प्रत्यारोप करून प्रचार करणार नाही, कोणाच्या विरोधात आम्ही बोलणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना स्थानिक नेत्यांना करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागाचा विकास होण्याच्या उद्देशाने पक्के रस्ते, मुलामुलींना शिक्षण, आरोग्यसेवा, किसान बहुमान, लाडकी बहीण सन्मान आणि शेतकऱ्यांना अनुदान अशा विषयावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
२०३४ पर्यंत फडणवीस राज…!
पुढे ते म्हणाले की, “विकासाच्या मुद्यांवर २०३४ पर्यंत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाच चेहरा जनतेला दिसत आहे. राज्यात विकासाचे वारे वाहत असताना अजित पवार यांचे अचानक सोडून जाणे हे आमच्यासह मुख्यमंत्र्यांना देखील जिव्हारी लागलेला आहे. म्हणून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री प्रचाराला जाणार नसल्याचे त्यांनी जाहीर करुन त्यांच्या संवेदना व्यक्त केल्या आहे. राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी चांगला निर्णय घेतला. मात्र आम्ही जाणार आहोत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणे योग्य नाही. मुख्यमंत्री जाणार नाहीत मात्र त्यांनी तुम्ही निर्णय घ्या.” असं सांगितलं असल्याचे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले आहे.
पक्षाचा निर्णय…..
“चौदा कोटी जनतेच्या दृष्टीने अजित पवार यांचे जाणे हे सुनेत्रा ताई यांचे दुःख खूप मोठे आहे. या दु:खातून सावरत त्यांनी पक्ष हीत अन् त्यांच्या पक्षातील नेत्यांना धीर देत जनतेच्या कल्याणासाठी धाडसी निर्णय घेतला आहे. अजित दादांचा जो संकल्प आहे, त्याला जिवंत ठेवण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी हा निर्णय घेतला. त्यांचा शपथविधी बाबत निर्णय राष्ट्रवादीचा आहे, त्यांनी जसं सांगितले तसे केले. त्यांनी प्रस्ताव दिला, त्यात ढवळाढवळ आम्ही केली नाही. नेते पदावर त्यांची घोषणा झाल्यावर त्यांनी निर्णय घेतला. त्यात आमचा काही सहभाग नाही, विकसित महाराष्ट्रासाठी छातीवर दगड ठेवून पक्षाने निर्णय घेतला. पक्षाने निर्णय घेतल्यावर मनात असो किंवा नसो त्यांचे पालन करणे आवश्यक आहे,” असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
हे देखील वाचा : चीनला थेट आव्हान! अर्थसंकल्पात ‘दुर्मिळ पृथ्वी मिशन’ची घोषणा; संरक्षण-तंत्रज्ञानात भारत स्वावलंबी होणार
हे तर विरोधकांचे काम
या शपथविधी सोहळ्यावर युतीतील मंत्रीच टीका करीत असल्याच्या मुद्यांवर बोलताना ते म्हणाले, “काहीही चुकीचे झाले तर त्याला भाजपा जबाबदार असे म्हणून विरोधक त्याचे काम करीत आहे. प्रत्यक्षात जनतेला सर्व काही स्पष्ट दिसत आहे. महापालिका निवडणुकीत विरोधक हरले म्हणून आरोप करत आहेत, ज्या ठिकाणी ते जिंकले त्याठिकाणी काय म्हणणार. आम्ही किती वेळा हरलो, मात्र आम्ही त्यातून शिकलो आणि पुढे गेलो, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
ग्रामीण सोलरच्या छायेत आले आहे
तीन लाखांचा पंप २५ हजार रुपयात देणार आहोत, शासकीय बांधकामांना सोलर टॉप बसवून देणार आहोत तशा योजना तयार केल्या आहेत. रस्ते विकासाची योजना, आरोग्य विभाग यांना सोलर माध्यमातून वीज देण्याचे नियोजन आहेत. असे ७४ विषय आहेत ज्यामधून ग्रामीण विकास होऊ शकेल. केंद्राचे आणि राज्याचे सरकार दोघांच्या माध्यमातून विकास केला जाईल असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.






