हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला येतो यासोबत रक्षाबंधन देखील साजरे केले जाते. नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. श्रावणातील ही पौर्णिमा ही समुद्र किनार्यालगत राहणार्या लोकांना मोठी आनंदाची असते. खवळलेला समुद्र शांत होतो, पावसाचा जोर ओसरतो व कोळी बांधव मासेमारीस प्रारंभ करतात. या दिवशी कोळी बांधव बोटींची पूजा करतात. बोटींना पताका लावतात. छान रंगरंगोटी करून बोटी सजवतात. समुद्राला शांत करण्यासाठी सोन्याचा नारळ अर्पण केला जातो. सोन्याचा नारळ, म्हणजे नारळाला सोनेरी कागदाचे वेष्टन लावून सजवलेला नारळ समुद्रात विधिवत सोडला जातो. समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते. या दिवशी विधिवत पूजन करून त्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. नारळ हे फळ शुभसूचक असून, ते सर्जनशक्तीचेही प्रतीक मानले गेले आहे.
संपूर्ण कुटुंबाला मागे ठेवून कोळी बांधव भर समुद्रात मासेमारीला निघतो. त्यावेळी कोळी महिलांची मदार सागरदेवावर असते. त्यामुळे कोळी महिलांच्या दृष्टीने या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नारळी पौर्णिमेनिमित्त खास बनवलेल्या नारळाच्या करंजा(पूर्ण्या) यांचा नैवद्य बोटीला व समुद्राला दाखवतात. समुद्राची यशासांग पूजा करतात. खोल समुद्रात मासेमारीला जाणाऱ्या आमच्या धन्याचे रक्षण कर असं साकड कोळी बांधव समुद्राला घालतात.
नारळी पौर्णिमेला कोळी महिलांसह बच्चे कंपनी घराघरांत सजावट करतात. कोळी किनारी नांगरून ठेवलेल्या होड्यांना रंगरंगोटी करतात. होड्या सजवतात. नवेद्यासाठी कोळी महिला ओल्या नारळाच्या करंज्या, नारळी भात, नारळी पाक तयार करतात. काही ठिकाणी भव्यदिव्य मिरवणुका काढण्यात येतात. त्यानंतर त्या दिवशी समुद्रकिनाऱ्यावर नाचगाणी यांच्यासह आनंदोत्सव साजरा केला जातो. सजवलेल्या बोटी समुद्रात ढकलून सागरप्रवासाचा मुहूर्त केला जातो.
असे मानले जाते की नारळीपौर्णिमेच्या दिवशी आपतत्त्वात्मक यमलहरींचे आधिक्य असते व नारळाच्या पाण्यातील तेजतत्त्व यमलहरींना ताब्यात ठेवत असल्याने जलावर ताबा मिळवणाऱ्या सागररूपी वरुणदेवतेला नारळ अर्पण करतात. या दिवशी ब्रह्मांडात आपतत्त्वात्मक यमलहरींचे आधिक्य असते, असे मानले जाते. या लहरी ब्रह्मांडात भोवऱ्याप्रमाणे गतिमान असतात. वरुणदेवता ही जलावर ताबा मिळवणारी व त्याचे संयमन करणारी असल्याने या दिवशी सागररूपी वरुणदेवतेला आवाहन करून तिला नारळ अर्पण करून ब्रह्मांडात कार्यरत असणाऱ्या यमलहरींना ताब्यात ठेवण्यासाठी प्रार्थना केली जाते.