नाश्त्यासाठी दक्षिण भारतीय पदार्थ खायला सगळ्यांचं आवडतात. या पदार्थांमध्ये इडली, डोसा , मेदुवडा हेच पदार्थ आपल्याला माहित आहेत. मात्र तांदूळ आणि डाळीपासून अजूनही वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. यातील एक हटके पदार्थ म्हणजे मैसूर डोसा. हा डोसा खाण्यासाठी अतिशय चविष्ट लागतो. दक्षिण भारतमध्ये तांदुळापासून बनवलेल्या पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन केले जाते. हा डोसा खाण्यासाठी कुरकुरीत आणि पातळ असल्याने याची चव देखील छान लागते. त्यामुळे हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी नक्कीच बनवू शकता. घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये मैसूर डोसा कसा बनवतात याची रेसिपी जाणून घेऊया..
साहित्य:-
१ वाटी तांदूळ, ३ चमचे तूर डाळ, १/४ कप उडीद डाळ,२-३ चमचे रवा, १ चमचा मेथी दाणे, २ बटाटे,१ कांदा बारीक चिरलेला, १ चमचा आलं लसणाची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर,तेल, १ चमचा जिरे-मोहरी, कढीपत्ता, चवीनुसार मीठ
कृती:-
सर्वप्रथम मैसूर डोसा बनवण्यासाठी तांदूळ, तूर डाळ, उडीद डाळ, मेथी हे सर्व ४ तासांसाठी भिजत घालून ठेवा. चार तास हे सर्व नीट भिजल्यानंतर त्यातील पाणी काढून ते मिक्सरच्या सहाय्याने वाटून घ्या. वाटून झाल्यानंतर त्यात रवा, मीठ आणि पाणी टाकून हे मिश्रण रात्रभर भिजत ठेवा. यामध्ये जास्त पाणी टाकू नये. त्यानंतर एका कुकरमध्ये २ बटाटे स्वच्छ धुवून ते उकडण्यासाठी ठेवा. ४ ते ५ शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या. बटाटे थंड झाल्यानंतर त्याची साल काढून बटाटे मॅश करून घ्या. नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कापलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, हिरवी मिरची बारीक वाटा. हे सर्व वाटून झाल्यानंतर कढईत तेल गरम करून त्यात जिरे मोहरीची फोडणी देऊन त्यात कांदा आणि पेस्ट घालून भाजून घ्या. भाजून झाल्यानंतर मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये ही फोडणी ओता.
डोसा बनवण्यासाठी रात्रभर भिजत ठेवलेले डोसा पीठ घेऊन त्यात आवश्यकतेनुसार पाणी टाकून पीठ बनवून घ्या. त्यानंतर गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर त्याला थोडं तेल लावून घ्या. नंतर त्यावर डोसाचं पीठ टाकून गोलाकार डोसा बनवा. डोसा थोडा शिजल्यानंतर त्यावर बटाट्याचे मिश्रण घालून घ्या. डोसाभोवती तेल लावून चांगला डोसा भाजून घ्या.तयार आहे मैसूर डोसा.