साहित्य:
सारणासाठी :
१/२ किलो गूळ
१ कप बेसन
२ सुक्या नारळाच्या वाट्या
३/४ कप तिळ
१/२ कप शेंगदाणे
१/२ कप खसखस
१/२ कप तेल
आवरणासाठी
दिड कप मैदा
३/४ कप कणिक
२ टेस्पून तेल
चिमूटभर मिठ
२ टेस्पून बेसन (ऐच्छिक)
कृती:
सुक्या नारळाच्या वाट्या किसून घ्याव्यात. नंतर त्याला सोनेरी रंग येईस्तोवर कोरडे भाजून घ्यावे. भाजलेले खोबरे हाताने चुरून घ्यावे. असा खोबऱ्याचा चुरा १/२ ते ३/४ कप गरजेचा आहे. तिळ आणि खसखस स्वतंत्र, कोरडेच भाजून घ्यावे. त्यांनतर शेंगदाणे देखील भाजून घेऊन त्याची साल काढून टाकावीत आणि अगदी बारीक कूट करून घ्यावे. एका मध्यम परंतु जाड बुडाच्या पातेल्यात १/२ कप तेल गरम करावे. त्यात १ कप बेसन खमंग भाजून घ्यावे.
गूळ बारीक किसणीवर किसून घ्यावा. सर्व भाजलेले जिन्नस (तिळ, खसखस, शेंगदाणे, बेसन, सुकं खोबरं) गूळामध्ये घालून मळून घ्यावे आणि घट्ट गोळा करावा. मैदा, कणिक, मिठ आणि बेसन (ऐच्छिक) एकत्र करावे. २ टेस्पून तेल कडकडीत गरम करून पिठात घालावे. पाणी घालून मध्यमसर घट्ट गोळा भिजवावा. आवश्यकता असल्यास त्यात थोडे साधे तेल घालावे. त्यानंतर ते १५ मिनीटे झाकून ठेवावे. सारणाचे सारख्या आकाराचे गोळे करून घ्यावे.
सारणाच्या गोळ्यापेक्षा जरा लहान असा पिठाचा गोळा करावा. २ पिठाच्या लाटयांमध्ये १ सारणाचा गोळा भरून लाटीच्या कडा सिल करून बंद करावा. हाताने हलके प्रेस करून थोड्या कोरड्या पिठावर पोळी लाटावी. गुळाची पोळी एका बाजूनेच लाटावी, ती बाजू पलटू नये. त्यानंतर मिडीयम हाय हिटवर तवा तापवून दोन्ही बाजू खरपूस भाजून घ्याव्यात. त्यानंतर गूळ पोळी कागदावर काढून किंचीत गार होवू द्यावी.
गुळपोळीवर साधारण थंड झाल्यानंतर त्यावर तूप घालून खाण्यासाठी सर्व्ह करावे.
टीप:
पिठांचे प्रमाण आवडीनुसार बदलू शकतो. जर तुम्हाला खुडखुडीत पोळी हवी असेल तर मैदा जास्त आणि कणिककमी वापरावी. तसेच गरम तेलाचे मोहनही घालावे. जर थोडी नरम पोळी हवी असेल तर फक्त गव्हाचे पिठ वापरावे आणि थंड तेलाचेच मोहन घालावे.