फोटो सौजन्य - Social Media
ट्रोमॅलिन बेट हे जगातील सर्वात एकाकी आणि लहान बेटांपैकी एक मानले जाते. या बेटाचा इतिहास जितका थरारक आहे, तितकाच तो मानवी क्रूरता आणि अदम्य इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. या बेटावर घडलेला थरार, या बेटाचा सगळ्यात मोठा इतिहास आहे. 1761 मध्ये येथे धडकलेला Utile हा जहाज. ‘युटिल’ (Utile) हे जहाज जेव्हा या प्रवाळ बेटाला धडकले, तेव्हा तिथे फक्त वाळू आणि काही झुडपे होती. जहाजावरील फ्रेंच खलाशांनी आपल्यासाठी एक छोटी नौका तयार केली आणि ते तिथून निघून गेले. जाताना त्यांनी वचन दिले की ते मदतीसाठी परत येतील, पण फ्रेंच सरकारने एका ‘बेकायदेशीर’ मानवी तस्करीसाठी पैसे खर्च करण्यास नकार दिला. परिणामी, ८० हून अधिक मालगासी (Madagascar) लोक तिथेच सोडून देण्यात आले.
बेटावर ना पिण्यायोग्य गोड पाणी होते, ना खाण्यासाठी फळे. पण, या माणसांनी हार मानली नाही. त्यांच्या संघर्षाचे काही थक्क करणारे पैलू म्हणजे त्यांनी जहाजाच्या अवशेषांचा वापर करत आग पेटवली आणि विशेष म्हणजे १५ वर्षे ती आग विझू दिली नाही. ही आग त्यांना रात्री उबदार ठेवायला आणि अन्न शिजवायला मदत करायची.
वादळांपासून वाचण्यासाठी त्यांनी समुद्रातील प्रवाळ (Coral) दगडांपासून जाड भिंतींची घरे बांधली. आजही पुरातत्व विभागाला या घरांचे अवशेष तिथे सापडतात. त्यांनी विहिरी खोदल्या, पण पाणी खारेच होते. पावसाचे पाणी साठवण्यासाठी त्यांनी तांब्याची भांडी वापरली. समुद्रातील कासव आणि पक्षी हेच त्यांचे मुख्य अन्न बनले.
वर्षे सरत गेली तशी लोकसंख्या कमी होत गेली. उपासमार, आजारपण आणि काही जणांनी समुद्रात तराफे बांधून पळून जाण्याचा केलेला प्रयत्न यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले. शेवटी १७७६ मध्ये, म्हणजे तब्बल १५ वर्षांनंतर, फ्रेंच खलाशी बर्नार्ड बौडिन याला या बेटावर काही लोक जिवंत असल्याचे दिसले.
जेव्हा बचाव पथक तिथे पोहोचले, तेव्हा तिथे फक्त ७ स्त्रिया आणि एक ८ महिन्यांचे बाळ शिल्लक होते. १५ वर्षांपूर्वी तिथे सोडलेल्या ८० लोकांपैकी फक्त हेच काही जण काळाशी झुंज देऊन जिवंत राहिले होते. आज हे बेट फ्रान्सच्या ताब्यात असून तिथे केवळ एक हवामान केंद्र (Weather Station) आहे. ट्रोमॅलिनची ही कथा आपल्याला सांगते की, माणसामध्ये जगण्याची उर्मी किती प्रबळ असते आणि संकटाच्या वेळी आपण निसर्गाशी जुळवून कसे घेऊ शकतो.






