काही आजार असल्यास गर्भधारणेत येतात समस्या (फोटो सौजन्य - iStock)
पीसीओएस, एंडोमेट्रिओसिस किंवा थायरॉईडच्या समस्यांशी झुंजत असताना गर्भधारणा शक्य आहे का असा प्रश्न प्रत्येक महिलेला पडतो. या परिस्थिती गर्भधारणा अधिक आव्हानात्मक ठरु शकते, परंतु योग्य वैद्यकीय उपचार, जीवनशैलीतील अचूक बदल आणि वेळीच उपचार केल्याने अनेक महिला यशस्वीरित्या गर्भधारणा करतात. डॉ. अवंतिका वझे – परब, फर्टिलिटी स्पेशालिस्ट, नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी, वाशी, मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे (फोटो सौजन्य – iStock)
गर्भधारणेत येणाऱ्या समस्या
पीसीओएस (पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम), एंडोमेट्रिओसिस किंवा थायरॉईड विकार सारख्या आरोग्य स्थिती असलेल्या महिलांना गर्भघारणेत अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. या हार्मोनल आणि प्रजनन आरोग्यासंबंधी समस्या ओव्हुलेशन प्रक्रियेत नकारात्मक परिणाम करतात तसेच ते अंड्याच्या गुणवत्तेवर परिणाम करतात आणि सतत प्रयत्न करूनही गर्भधारणा करणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरते.
पीसीओएस अनेकदा तुमच्या मासिक पाळीच्या चक्रात व्यत्यय आणू शकते, परिणामी अनियमित मासिक पाळीची समस्या उद्भवते. यामुळे ओव्हुलेशन ट्रॅक करणे आणखी कठीण होते. एंडोमेट्रिओसिसमुळे प्रजनन अवयवांना जखम आणि सूज येऊ शकते. थायरॉईड विकारामुळे होणारे हार्मोनल असंतुलन, हायपोथायरॉईडीझम असो किंवा हायपरथायरॉईडीझम, केवळ प्रजननक्षमतेवरच नव्हे तर गर्भावरदेखील आरोग्यावर देखील परिणाम करू शकते. म्हणूनच या आजार असलेल्या महिलांनी सावधगिरी बाळगणे आणि त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. वेळीच निदान, वैद्यकीय उपचार आणि जीवनशैलीतील बदलांच्या मदतीने पालकत्वाचा प्रवास सुखकर करता येतो. गर्भधारणेसाठी प्रयत्न करताना काय काळजी घ्याल? याबाबत अधिक माहिती घेऊया
PCOS आणि थायरॉईडमध्ये काय आहे संबंध? कशी करावी चाचणी
प्रजनन तज्ज्ञांचा सल्ला घ्या
जर तुम्ही पालकत्वासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्ही प्रथम प्रजनन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, विशेषतः जर तुम्हाला प्रजनन आरोग्यासंबंधी काही समस्या अथवा आजार असतील. प्रजनन तज्ज्ञ तुमच्या प्रजनन आरोग्याचे अचूक मूल्यांकन करतील, आवश्यक त्या चाचण्या करतील आणि तुमच्या शक्यता सुधारण्यासाठी प्रभावी उपचारांची शिफारस देखील करतील.
हार्मोन्सचे संतुलन
दैनंदिन जीवनशैलीत छोटे बदल करून त्यांच्या हार्मोन्सचे नियमन करता येते. यामध्ये संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि तुमच्या हार्मोन्सची पातळी स्थिर करण्यासाठी तुमच्या तणावाच्या पातळीचे व्यवस्थापन करणे समाविष्ट असू शकते. नैसर्गिकरित्या तुमची प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी हे आवश्यक आहे.
पीसीओएस नियंत्रण
कृपया लक्षात ठेवा की पीसीओएससाठी कायमस्वरूपी उपचार नाही. तथापि, आहार आणि जीवनशैलीतील बदल ते नियंत्रणात ठेवण्यात लक्षणीय मदत करतील. नियमित व्यायाम, निरोगी आहार आणि शरीराचे वजन नियंत्रित राखणे हे पीसीओएसशी संबंधित लक्षणे कमी करण्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत.
PCOS आणि लठ्ठपणाशी निगडित समज आणि गैरसमज, काय सांगतात तज्ज्ञ
एंडोमेट्रिओसिसचे नियंत्रण करा
एंडोमेट्रिओसिस हे वेदनादायक मासिक पाळी, दीर्घकालीन ओटीपोटात होणाऱ्या वेदना आणि वंध्यत्वाशी संबंधित आहे. काही काळासाठी ते वैद्यकीयदृष्ट्या व्यवस्थापित केले जाऊ शकते परंतु बहुतेकदा लॅप्रोस्कोपीद्वारे शस्त्रक्रियेद्वारे त्यांचे व्यवस्थापन केले जाऊ शकते. जर तुम्ही गर्भधारणेची योजना आखत असाल, तर कृपया प्रजनन तज्ञांचा सल्ला घ्या कारण एंडोमेट्रिओसिस ही वारंवार होणारी स्थिती आहे आणि एंडोमेट्रिओसिसशी संबंधित वंध्यत्वासाठी अचूक व्यवस्थापन आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांची आवश्यकता भासते.
थायरॉईड पातळीचे निरीक्षण करा
जर तुम्हाला थायरॉईडचे निदान झाले तर T3, T4 आणि TSH सारख्या रक्त चाचण्यांच्या मदतीने तुमच्या थायरॉईड पातळीचे नियमितपणे निरीक्षण करणे आवश्यक आहे. थायरॉईड असंतुलन ओव्हुलेशन आणि गर्भघारणेवर नकारात्मक परिणाम करू शकते. नियमित तपासणी करून आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वेळेवर औषधे घेतल्याने तुमचे थायरॉईड कार्य संतुलित करण्यास मदत होऊ शकते.