आजच्या धावपळीच्या आणि दगदगीच्या युगात वीकेंडला एखाद्या मोठ्या चकचकीत हॉटेलमध्ये किंवा कॅफेमध्ये जाऊन पार्टी करणे ही शहरांमधील एक नवीन फॅशन झाली आहे. पण आपल्या ग्रामीण भागात, विशेषतः महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील तरुणाईसाठी फेमस असणारी पार्टीची एक वेगळीच, अस्सल आणि मनाला भिडणारी गावरान व्याख्या आहे. ती म्हणजे सर्व मित्रांनी एकत्र येऊन साजरी केलेली ‘रानपार्टी’ किंवा शेतातली चूल पार्टी! मित्रांचा हक्काचा ग्रुप, दुचाकींवर पाठीमागे बांधलेली मोठी भांडी, घरून चोरून आणलेला तिखट-जाळ मसाला, चिकन मसाला ,चटणी आणि सगळ साहित्य आणि निसर्गाचे मोकळे सानिध्य… हा अनुभव जगातील कोणत्याही फाईव्ह स्टार हॉटेलमधील महागड्या जेवणापेक्षा कित्येक पटीने भारी आणि आनंद देणारा असतो.
रानपार्टीची तयारी
या रानपार्टीची खरी सुरुवात होते ती वीकेंडच्या दोन-तीन दिवस आधीपासूनच. “या रविवारी शेतात पार्टी करायची, जेवायला जायचं!” असं व्हॉट्सॲप ग्रुपवर ठरलं की मग प्रत्येकाकडे एक स्पेशल जबाबदारी सोपवली जाते. कुणीतरी घरच्यांची नजर चुकवून ताजे वाटलेले खडे मसाले आणतं, कुणी अस्सल चिकनची सोय करतं, तर कुणी घरची मोठी अल्युमिनियमची भांडी, तेल आणि चूल पेटवण्यासाठी सुकी लाकडं गोळा करण्याची महत्त्वाची ड्युटी घेतं. गावाबाहेरच्या एखाद्या जुन्या विहिरीशेजारी, एखाद्याच्या शेतात, गोठ्याच्या शेडमध्ये किंवा नदीकाठच्या शांत ठिकाणी या पार्टीसाठी हक्काची जागा निवडली जाते.
शेतावरची धमाल आणि चुलीवरच जेवण
नियोजित जागेवर पोहोचल्यावर तिथली खरी धमाल सुरू होते. इथे हॉटेलसारखा कोणताही ऑर्डर घेणारा वेटर किंवा आचारी नसतो, तर प्रत्येक मित्र स्वतःला मोठा शेफ समजू लागतो. शेतातल्या तीन दगडांची चूल मांडून, त्यावर लाकडांचा जाळ करून जेव्हा चिकन शिजायला लागतं, तेव्हा सुटणारा तो खमंग सुवास अख्ख्या रानात पसरतो. कुणी कांदा-टोमॅटो चिरण्यात व्यस्त असतं, कुणी चूल फुंकण्यात, तर कुणी काहीही काम न करता फक्त फुकटचे सल्ले देण्यात मग्न असतं. मोबाईलचे नेटवर्क नसलेल्या या निसर्गाच्या कुशीत, एकमेकांच्या टाळ्या घेत आणि जुन्या आठवणींना उजाळा देत चाललेल्या गप्पा म्हणजेच या मैफलीचा खरा आत्मा असतो.
चुलीवरच्या पार्टीची अनोखी संस्कृती
महाराष्ट्रात तर या अनोख्या संस्कृतीला फार पूर्वीपासून खूप मोठे स्थान लाभले आहे. सुट्ट्यांमध्ये शहरातून गावात येणाऱ्या नोकरदार किंवा शिकणाऱ्या मित्रांसाठी हा सर्वात मोठा सेलिब्रेशनचा आणि एकत्र येण्याचा मार्ग असतो. दुपारच्या वेळेला मोकळी ताजी हवा, झाडांची थंडगार सावली ;तर रात्रीच्या वेळेला शांत थंडगार वातावरण यांच्या सोबतीने पत्रावळीवर वाढलेलं किंवा घरून आणलेल्या ताटात ते गरमागरम, झणझणीत वशाठ जेवताना मन जे तृप्त होऊन समाधान मिळत, ते कुठेही पैशान विकत मिळू शकत नाही.
फक्त जेवणाचा नव्हे; तर मैत्रीच्या जिव्हाळ्याचा सोहळा
थोडक्यात सांगायचे तर, ही रानपार्टी केवळ खाण्यापिण्याचा किंवा भूक भागवण्याचा कार्यक्रम नसून, ती मैत्रीची वीण अधिक घट्ट करणारा एक जिव्हाळ्याचा सोहळाच म्हणायला पाहिजे. हॉटेलच्या बंद एसी रूमपेक्षा मातीच्या सुगंधात आणि जिवाभावाच्या मित्रांच्या गोतावळ्यात साजरी होणारी ही ‘गावरान पार्टी’ प्रत्येकाला मनातून तृप्त करते. म्हणूनच, ग्रामीण भागातील तरुणांसाठी ही रानपार्टी म्हणजे केवळ दुपारचे किंवा रात्रीचे जेवण नसून, आयुष्यभर मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवावी अशी एक अत्यंत सुंदर आणि गोड आठवण ठरते.






