फोटो सौजन्य - Social Media
महिन्याभराने पावसाची चाहूल लागेल. पावसाच्या बरसत्या सरी मनामध्ये हिरवळ पाहण्याची इच्छा जागी करेल. तेव्हा भटकंतीची आवड असणारे भटके निसर्गाच्या सान्निध्यात जाण्यासाठी तयार होतील. जर तुम्हीही त्या निसर्गरम्य प्रवास आणि Adventureची अगदी मनापासून वाट पाहत आहात तर आतापासूनच तयारीला लागा. गडकिल्ल्यांची सफर करण्याची इच्छा आहे आणि जर तुम्ही मुंबई पुण्यासारख्या शहरात राहता तर हा लेख तुमच्यासाठी आहे. यंदाची सह्याद्री सफर घडवा रायगडाच्या पावन मातीत! रायगड जिल्ह्यामध्ये फक्त किल्ले नाही तर किल्ल्यांची खाण आहे. रायगडाच्या मातीत मराठ्यांच्या रक्ताने माखलेला इतिहास आहे. जर तुम्ही मुंबई किंवा पुण्यात राहात असाल तर नक्कीच रायगड जिल्ह्यामध्ये असणाऱ्या या किल्ल्यांची सफर नक्कीच करा. यातील काही किल्ले चढाईस कठीण आहेत तर काही अगदी सोपे आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे येथे सागरी किल्लेही आहेत. चला तर मग रायगड जिल्ह्ह्यातील तालुक्यांनुसार किल्ले जाणून घेऊयात.
रायगड जिल्ह्यातील तालुकानुसार गडकिल्ले :
रायगड जिल्ह्याची शान आणि अवघ्या महाराष्ट्राचा जीव की प्राण दुर्गदुर्गेश्वर किल्ले श्री रायगड महाड तालुक्यात येतो. तसेच महाड तालुक्यात पाचाड कोट, लिंगाणा, सोनगड, चांभारगड, मंगळगड, कोकणदिवा आणि दासगाव हे किल्ले आहेत. महाडच्या शेजारच्या पोलादपूर तालुक्यात चंद्रगड आणि कोंढवी हे दोन किल्ले आहेत. श्रीवर्धन या सागरी किनाऱ्यावरील तालुक्यात मदगड आहे. तर माणगाव तालुक्यात विश्रामगड, मानगड आणि पन्हाळेदुर्ग हे किल्ले आहेत.
जर तुम्ही मुंबईहून जवळ असणाऱ्या किल्ल्यांवर ट्रेक करण्याचा विचार करत आहात तर नक्कीच पनवेल, पेण, कर्जत आणि अलिबाग तालुक्यातील दुर्ग जवळ पडतील. पनवेल तालुक्यात प्रबळगड, कर्नाळा आणि माणिकगड हे किल्ले आहेत. तर पेण तालुक्यात सांकशी, रतनगड आणि मिरगड आहे. कर्जत तालुक्यात अनेक कठीण सराईचे मानले जाणारे गडकिल्ले आहेत. विकटगड, पदरगड, कोथळीगड, भिमगड, सोंडई, ठाक बहिरी, तुंगी तसेच सोनगिरी हे प्रसिद्ध गडकिल्ले कर्जत तालुक्यात आहेत. मुळात, कर्जतचा पट्टा गडकिल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे.
पुण्याकडून कर्जत तसेच सुधागड तालुक्यातील सुधागड, भोरपगड, सरसगड आणि मृगगड अगदी जवळ आहेत. अलिबाग आणि मुरुड तालुक्यात सागरी किल्ले आहेत. जंजिरा, कोरलई, समराजगड, पद्मदुर्ग तसेच उंदेरी, खुबलढा, कुलाबा, सर्जेकोट, सागरगड, रेवदंडा, हिराकोट, रामदरणे आणि राजकोट हे किल्ले ट्रेकर मंडळींमध्ये फार प्रसिद्ध आहेत.
रायगड जिल्ह्यातील अनेक किल्ले अजूनही पर्यटकांच्या मुख्य प्रवाहाबाहेर आहेत. त्यामुळे पावसाच्या दिवसांत इथलं सौंदर्य अधिक खुलतं. काही वाटा कठीण असल्या तरी थरार, रोमांच आणि निसर्गरम्य दृश्यांनी भरलेला अनुभव देतात. तर तुम्हीही या वर्षीचा मान्सून खास बनवू इच्छित असाल, तर या यादीतील गड-किल्ल्यांना नक्की भेट द्या!