हिंदू धर्मानुसार श्रावणाला धार्मिक महत्व आहे. असं म्हणतात की महादेवांना श्रावण महिना प्रिय आहे, त्यामुळे हा महिना व्रत-वैकल्याचा म्हटला जातो. देव धर्म या दिवसात मोठ्या प्रमाणात असल्याने हा सात्त्विक महिना म्हणून देखील ओळखला जातो. आरोग्याच्या दृष्टीकोनातून पाहायचं झालं तर या महिन्यात पचनसंस्था नाजूक होते त्यामुळे श्रावणात आहार कसा असावा याबाबत आयुर्वेदात सांगितलं आहे.
आयुर्वेदानुसार श्रावण महिन्यात वातावरणातील आर्द्रता अधिक वाढते. त्यामुळे सूर्यप्रकाश कमी असतो. या दिवसात पाचनशक्ती कमकुवत असते. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. आयुर्वेदानुसार श्रावण महिन्यात हलका, पचायला सोपा आणि सात्त्विक आहार घ्यावा.
आयुर्वेदानुसार या महिन्यात तामसी पदार्थ खाणं शक्यतो टाळावं. या महिन्यात तामसी आहाराचं सेवन केल्याने शारीरिक आणि मानसिक पातळीवर याचा मोठ्या नकारात्मक परिणाम होतो असं म्हटलं जातं. शरीर आणि मन यांचा परस्परांशी संबंध असल्या कारणाने आपण जो आहार घेतो त्याचा परिणाम हा मनावर देखील जाणवतो. म्हणूनच मानसिक शांतता मिळवण्यासाठी तामसी मांसाहार सोडून सात्विक आहाराचं सेवन करणं फायदेशीर होतं, असं सांगितलं जातं.
श्रावणात सात्विक आहार महत्वाचा आहे. या दिवसात पचायला त्रास होणार नाही असा आहार घेणं महत्वाचं आहे. सात्विक आहार म्हणजे वरण-भात, खिचडी, मूगडाळ, ताजे फळ, दूध, ताक, गोड भाज्या (जसे की दुधी भोपळा, गाजर, बीट) हे पदार्थांचं सेवन करावं. हे पदार्थ पचायला हलके असतात. या दिवसात अपचन किंवा पोटाच्या तक्रारी सुरु होतात याचकारणामुळे श्रावणात हलका आहार घ्यावा.
श्रावणात रोगराईचं साम्राज्य वाढलेलं असतं त्यामुळे त्यामुळे पालेभाज्या आणि फळे योग्य प्रकारे धुऊन खावेत. पावसाळ्यात पालेभाज्यांमध्ये जंतूंचा धोका अधिक असतो, त्यामुळे त्या उकडून खाणे योग्य. केळी, डाळिंब, सफरचंद, पेरू यांसारखी फळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. आपली भारतीय संस्कृती ही ऋतूचक्रावर आधारित आहे. त्यामुळे श्रावणात आरोग्याच्या विचार करुन काय खावं आणि काय खाऊ नये यबाबात आयुर्वेदात माहिती दिलेली आहे. मांसाहार, अंडी, लसूण-प्याज, मद्य, फास्ट फूड, तळलेले आणि आंबट पदार्थ टाळावेत. हे अन्न जड आणि पचायला कठीण असल्यामुळे अपचन, गॅस आणि पित्ताचा त्रासा वाढू शकतो. म्हणूनच या महिन्यात आहार हा सात्विक असावा असं सांगण्यात येतो.