सुधागडाचा ऐतिहासिक 'पूर्व बुरुज' पुन्हा पर्यटकांसाठी खुला
भारतातील असे 5 मंदिर जे वर्षातून फक्त एकदाच खुले होतात; इथे होते प्रत्येक इच्छा पूर्ण
गवत आणि काटेरी झुडपांचे साम्राज्य हटवले:
डिसेंबर २०२४ मध्ये केलेल्या पाहणीदरम्यान या बुरुजाकडे जाणारा मार्ग दाट झाडी आणि गवतामुळे पूर्णपणे बंद असल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी केवळ गाईडच्या मदतीनेच तिथे पोहोचता येत होते. हा अडथळा दूर करण्यासाठी ट्रेक क्षितिजच्या टीमने २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजल्यापासून मोहिमेला सुरुवात केली. टीममधील सदस्यांनी जिद्दीने काम करत दुपारी ३ वाजेपर्यंत सुमारे १ किलोमीटरचा मार्ग पूर्णपणे साफ केला.
धोकादायक वाटेला सुरक्षित पर्याय :
बुरुजाकडे जाणारी मूळ वाट काही ठिकाणी अत्यंत धोकादायक (Exposed) होती. ट्रेक क्षितिजच्या टीमने श्रमदानातून या वाटेला एक सुरक्षित पर्यायी मार्ग तयार केला आहे, ज्यामुळे ट्रेकर्सचा प्रवास आता सुकर आणि सुरक्षित होणार आहे.
मोहिमेदरम्यान वेळ वाचवण्यासाठी टीमने दुपारचे जेवणही लांबणीवर टाकले. बुरुजावर खाली उतरण्याच्या पायऱ्यांवर साचलेले दगड, गवत आणि काटेरी झुडपे उपसण्याचे काम अत्यंत कष्टदायक होते. मात्र, सलग २ तासांच्या मेहनतीनंतर बुरुजावर उतरण्याचा मार्ग आणि बुरुजाचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. आता गडप्रेमी /पर्यटकांना या ऐतिहासिक बुरुजाचे दर्शन जवळून घेता येणार आहे.
पूर्व बुरुजाचे ऐतिहासिक महत्त्व:
सुधागडच्या संरक्षणाच्या दृष्टीने पूर्व बुरुज अत्यंत मोक्याचा मानला जातो. भोरप्याची नाळ किंवा घोडजीन वाटेने येणाऱ्या शत्रूला रोखण्यासाठी या बुरुजाची रचना महत्त्वाची होती. जर शत्रूने हा बुरुज जिंकला असता, तर त्यांना थेट महादरवाजापर्यंत पोहोचणे सोपे झाले असते. त्यामुळे या बुरुजाचे संवर्धन होणे ऐतिहासिक दृष्टीने अत्यंत मोलाचे आहे.
“मांडवीकोटावरील सलग ५ मोहिमांनंतर आम्ही सुधागडचा पूर्व बुरुज मोकळा करण्याचा संकल्प केला होता. आमच्या टीमने दाखवलेल्या चिकाटीमुळे आज हा ऐतिहासिक वारसा पुन्हा एकदा सर्वांसमोर आला आहे. दुर्ग संवर्धनाचे हे कार्य आम्ही पुढेही असेच सुरू ठेवू.” — शुभम सावंत (मोहीम प्रमुख, ट्रेक क्षितिज संस्था, डोंबिवली)
Antarctica Blood Falls : अंटार्टिकाच्या सफेद बर्फातून वाहणाऱ्या त्या लाल पाण्याचे रहस्य काय?
मोहिमेत सहभागी सदस्य :
प्रशांत राबांडे, महेंद्र गोवेकर, राहुल मेश्राम, प्रिया कराडकर, संदेश मुठे, कपिल कुलकर्णी , शैलजा धनगर, प्रणाली नारकर, सुजल राबांडे, अथर्व गावकर, तृप्ती मांजरेकर, प्राची कोकाटे, सागर रासम, प्रशांत साठे, स्नेहल झोपे, सोनाली मांजरेकर, निकिता पवार.






