'एआय'च्या मदतीने टीबीवर उपचार! १०० दिवसांत उच्च-जोखीम भागांची झडती; 'निक्षय' प्रणालीचे नियंत्रण
पारंपरिक तपासणीपद्धतीला छेद देत आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) च्या आधारे क्षयरोग शोध मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘टीबी मुक्त भारत’ अभियानाअंतर्गत २४ मार्चपासून सुरू होणाऱ्या १०० दिवसांच्या विशेष मोहिमेत राज्यातील ११ हजारांहून अधिक जोखीमग्रस्त गावे आणि शहरी भागांवर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, संपूर्ण मोहिमेवर ‘निक्षय’ प्रणालीद्वारे तत्काळ नियंत्रण ठेवण्यात येणार असून दिवसनिहाय नियोजनावर भर देण्यात आला आहे. यामुळे रुग्णांचा लवकर शोध, वेळेत उपचार आणि मृत्यूदरात घट साध्य करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.(फोटो सौजन्य – AI)
क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने यंदाची मोहीम ही केवळ जनजागृतीपुरती मर्यादित न राहता तंत्रज्ञानाधारित ‘सक्रिय शोध मोहीम’ ठरणार आहे. यासाठी प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने ‘जोखीम नकाशे’ (वुल्नरेबिलिटी मॅपिंग) तयार करण्यात आले असून त्यावर आधारित राज्यातील ११,०९१ गावे व शहरी वॉर्ड निवडण्यात आले आहेत. या मोहिमेत पारंपरिक लक्षणांवर आधारित तपासणीऐवजी थेट जोखीमग्रस्त लोकसंख्येची सक्रीय तपासणी केली जाणार आहे.
वृद्ध, मधुमेही, कुपोषित, एचआयव्ही बाधित, क्षयरुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती तसेच स्थलांतरित आणि झोपडपट्टीतील नागरिक यांना प्राधान्याने तपासले जाणार आहे. विशेष म्हणजे, हाताळण्यास सोपी कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित क्ष-किरण यंत्रे वापरून जलद तपासणी केली जाणार असून सशयित रुग्णांना तात्काळ पुढील तपासण्यासाठी पाठविण्यात येईल, दुर्गम आणि आदिवासी भागांत ‘निक्षय’ चलनशील पथकांद्वारे सेवा पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या मोहिमेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे क्षयरोगासोबत इत्तर आजारांचीही एकत्रित तपासणी. आयुष्मान आरोग्य शिबिरामधून मधुमेह, उच्च रक्तदाब, रक्तक्षय आणि कुपोषण यांची तपासणी केली जाणार आहे.






