
Hair Fall Control Tips: केसांच्या समस्यांनी त्रस्त आहात? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
आजकाल केस गळणं ही सगळ्यांचीच समस्या झाली आहे. कधी पाण्यामुळे, कधी प्रदूषणामुळे तर कधी टेन्शनमुळे केस गळतात. बाजारातलं महागडं तेल, शॅम्पू लावून पण काही फरक पडत नाही. उलट केमिकलमुळे केस अजून खराब होतात.
मग काय करायचं? असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. आता घरच्याच तेलात या गोष्टी टाकून असं तेल बनवा की ज्याने केसांना आतून ताकद येईल. हे तेल नैसर्गिक आहे, त्याचा काही साईड इफेक्ट पण नाही. रोज नाही पण आठवड्यातून 2-3 वेळा लावलं तरी केस गळणं कमी होईल, केस दाट आणि काळेभोर होतील. Hair Fall Control Tips:
एक कप थंड पद्धतीने काढलेलं खोबरेल तेल म्हणजे कोल्ड-प्रेस तेल
7-8 जास्वंदीची फुलं
8-10 जास्वंदीची पानं
2 मोठे चमचे मेथी दाणे
सगळ्यात आधी जास्वंदीची फुलं आणि पानं स्वच्छ धुवून घ्या. धुतल्यानंतर ती एका कपड्यावर पूर्ण वाळवून घ्या. पाणी राहिले तर तेल खराब होईल.आता मेथीचे दाणे, जास्वंदीची फुलं आणि पानं एकत्र घेऊन खलबत्त्यात जरा जाडसर कुटून घ्या. मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करू नका, फक्त कुटायचं आहे.आता एक जाड बुडाची लोखंडी कढई घ्या. त्यात एक कप खोबरेल तेल टाका. गॅस एकदम मंद ठेवा. तेल कडकडीत गरम करायचं नाही, फक्त कोमट गरम करायचं आहे.
तेल थोडं गरम झालं की त्यात कुटलेली मेथी आणि जास्वंद टाका. गॅसनर तेल मंद आचेवर 10 ते 15 मिनिटं उकळू द्या. हळू हळू तेलाचा रंग बदलेल, थोडा तपकिरी होईल आणि छान वास येईल. रंग बदलला की गॅस बंद करून टाका. तेल पूर्ण थंड होऊ द्या. घाई करू नका. थंड झाल्यावर एक सुती कापड घ्या आणि त्याने तेल गाळून घ्या. सगळा कचरा निघून जाईल. आता हे तेल एका काचेच्या बाटलीत भरून ठेवा. हे तेल महिनाभर आरामात टिकतं.
खोबरेल तेल केसांना आतून ओलावा देतं आणि केस तुटणं थांबवतं.
मेथीच्या दाण्यांनी मुळांना ताकद मिळते, त्यामुळे केस गळणं कमी होतं आणि कोंडा पण जातो.
जास्वंद तर केसांसाठी वरदानच आहे. त्याने नवीन केस यायला मदत होते आणि केस लवकर पांढरे होत नाहीत.
तेल थेट थंड लावू नका. थोडं कोमट करा. बोटांनी केसांच्या मुळाशी लावा आणि हलक्या हाताने 5 मिनिटं मसाज करा. केसांना जोरात घासू नका. आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा असं करा. एक-दोन तास ठेवा आणि नंतर सौम्य शॅम्पूने धुवा. बाजारच्या तेलापेक्षा हे घरचं तेल नक्कीच जास्त गुणकारी आहे. एकदा करून तर बघा.