फोटो सौजन्य - Social Media
डोलो-६५० ही गोळी पॅरासिटामोल या घटकापासून बनलेली आहे. ताप उतरवण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी पॅरासिटामोल प्रभावी मानले जाते. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा गरज नसताना हे औषध वारंवार घेतल्यास ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. युनायटेड किंगडमच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रौढ व्यक्तींनी एकावेळी ५०० मिग्रॅच्या एक किंवा दोन गोळ्यांपेक्षा जास्त औषध घेऊ नये. तसेच २४ तासांत एकूण ८ गोळ्यांपेक्षा जास्त पॅरासिटामोल घेणे टाळावे. या मर्यादेपेक्षा जास्त सेवन केल्यास गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.
पॅरासिटामोलचा ओव्हरडोस झाल्यास शरीरावर विविध साईड इफेक्ट्स दिसून येऊ शकतात. त्यामध्ये त्वचेवर पुरळ येणे, अंगावर खाज सुटणे, घशात सूज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, मळमळ किंवा अस्वस्थता अशी लक्षणे आढळतात. काही वेळा ही लक्षणे लगेच दिसत नाहीत, पण औषधाचा परिणाम आतून हळूहळू शरीरावर, विशेषतः लिव्हरवर होत राहतो. लिव्हर हे शरीरातील अत्यंत महत्त्वाचे अवयव असून पॅरासिटामोलचा अतिरेक त्याला गंभीर इजा पोहोचवू शकतो. लिव्हर डॅमेजची सुरुवातीची लक्षणे अनेकदा दुर्लक्षित होतात. अचानक वजन कमी होणे, भूक न लागणे, सतत थकवा जाणवणे, त्वचा किंवा डोळे पिवळे पडणे (पिवळ्या काविळीसारखी लक्षणे) ही लिव्हर बिघडल्याची चिन्हे असू शकतात. वेळेत उपचार न झाल्यास परिस्थिती जीवघेणीही ठरू शकते.
अनेक जण औषध घेताना त्यातील घटक वाचत नाहीत, ही सर्वात मोठी चूक आहे. सर्दी-खोकला, ताप किंवा वेदनांसाठी दिल्या जाणाऱ्या अनेक औषधांमध्ये आधीच पॅरासिटामोल असते. अशा वेळी वेगळी डोलो-६५० घेतल्यास अनवधानाने ओव्हरडोस होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे एकाच वेळी पॅरासिटामोल असलेली अनेक औषधे घेणे टाळणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच, हलका ताप किंवा अंगदुखी असल्यास लगेच औषध घेण्याऐवजी थोडी विश्रांती घ्या, पुरेसे पाणी प्या आणि संतुलित आहार घ्या. त्रास वाढत असेल किंवा जास्त दिवस टिकत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणेच योग्य. औषध म्हणजे तात्पुरता उपाय असतो; त्याचा अतिरेक आरोग्यासाठी घातक ठरू शकतो, हे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे.






