फोटो सौजन्य - Social Media
रस्त्यांवरून धावणाऱ्या ट्रकांमध्ये आपण अनेकदा एक गोष्ट पाहतो. टायरजवळ लटकलेल्या काळ्या रंगाच्या रबर पट्ट्या. या पट्ट्या बहुतेक वेळा जुन्या टायर ट्यूब्सपासून बनवलेल्या असतात आणि बर्याच लोकांना वाटतं की या केवळ सजावटीसाठी असतात, किंवा ट्रकला नजर लागू नये म्हणून लावल्या जातात. पण यामागे एक अतिशय उपयोगी आणि शहाणपणाची कल्पना आहे, जी ट्रकच्या देखभालीत खूप मोठी भूमिका बजावते.
हे रबरचे तुकडे खरं तर ट्रकच्या टायरचे स्वच्छतेसाठी असतात. जेव्हा ट्रक धूळ, माती किंवा कीचडाने भरलेल्या रस्त्यावरून जातो, तेव्हा टायरवर ही सगळी घाण साचते. हीच घाण टायरच्या पकडीत अडथळा निर्माण करू शकते आणि टायर लवकर खराब होण्याची शक्यता वाढवते. ट्रकच्या टायरजवळ झुलणाऱ्या या पट्ट्या सतत टायरला स्पर्श करत राहतात, त्यामुळे त्या झुलता झुलता टायरवरची माती, धूळ आणि किरकोळ दगड बाजूला झटकून टाकतात. या मुळे टायर स्वच्छ राहतो आणि त्याचा दर्जा टिकतो.
ट्रक ड्रायव्हरला प्रत्येक वेळेस थांबून टायर साफ करण्याची गरज राहत नाही, आणि प्रवासातही कोणतीही अडचण येत नाही. ही रबर पट्टी म्हणजे एकप्रकारचा ‘मोबाईल टायर क्लिनर’च आहे. यामुळे केवळ टायरचे आयुष्य वाढते असे नाही, तर ट्रकची रस्ता पकड सुधरत जाते आणि इंधनाचा अपव्ययही कमी होतो. या देसी जुगाडाचा खर्च फारसा येत नाही. जुन्या ट्यूब्सपासून तयार केलेल्या या पट्ट्या सहज उपलब्ध होतात आणि त्यासाठी वेगळं तंत्रज्ञान लागत नाही. त्यामुळे त्याचा वापर अनेक ट्रक चालक करतात. या छोट्याशा रबर पट्ट्यांमुळे वेळ, पैसा आणि मेहनत वाचते आणि वाहनाची कार्यक्षमता वाढते.
म्हणूनच, पुढच्यावेळी रस्त्यावर एखादा ट्रक दिसला आणि त्याच्या टायरजवळ रबरच्या पट्ट्या झुलताना दिसल्या, तर लक्षात ठेवा. त्या केवळ शोभेच्या नाहीत, तर एका स्मार्ट आणि उपयोगी यंत्रणेचा भाग आहेत, ज्या रोज लाखो किलोमीटर चालणाऱ्या ट्रकच्या टायरची काळजी घेतात.