Horror Story:
प्रेम म्हणजे काय? आयुष्यभर एकत्र राहण्याचे वचन! प्रेम म्हणजे एकमेकांना दिलेला शब्द… प्रेम म्हणजे एकमेकांसाठी समर्पित असे आयुष्य! आयुष्यभरासाठी एखादा शब्द पाळणारे या जगात फार कमी असतात. शब्द त्याने ही पाळला होता पण तो या जगात नव्हता. प्रेमाला दिलेला शब्द पाळणारे लोकं या जगात असणेच गरजेचे नसतात काही तर जगात नसून तो शब्द पाळतात, याचे उत्तर उदाहरण सांगणारी ही कथा मुंबईच्या पवई तलाव परिसरात घडलेली आहे.
1980चा काळ, विवेक गोरेगाव परिसरात राहणारा खोडकर मुलगा! तन्वी वर्गामध्ये प्रत्येक गोष्टीत अव्वल असणारी सद्गुनी मुलगी! एकाच वर्गामध्ये शिकणारे ही दोन्ही मुले एकमेकांच्या परिचयात जरी असले तरी दोघांच्यात फार काही बोलणे नव्हते. विवेक त्याच्या पालकांपासून दूर गोरेगाव मध्ये वास्तव्यास होता. तर तन्वी पवई मध्येच त्यांच्या शाळेच्या संलग्न असणाऱ्या हॉस्टेलमध्ये राहत होती.
विवेक शेवटच्या बाकावर बसणारा अतरंगी मुलगा, त्याला तन्वी फार आवडायची. पण तन्वी त्याच्याकडे फार काही लक्ष देत नव्हती. पण विवेक तिच्यासाठी पार वेडा झाला, आणि त्याने तिला त्याच्या भावना सांगण्याचे ठरवले. त्याने तन्वीला पवई येण्यासाठी सांगितले, तन्वी आधी काही येण्यास तयार होत नव्हती. पण नंतर ती तेथे येण्यास राजी झाली, तिला माहित होते की विवेक तिला कशासाठी बोलवत आहे.
दोघे पवई तलावाच्या काठावर येऊन भेटतात. विवेक तिला त्याच्या मनातील भावना सांगतो पण तन्वी त्याला जागेवरच नकार देते. त्याला म्हणते, “मी इतकी हुशार! मला आपल्या शाळेत सगळीकडे मान आहे. तू उनाडक्या करणारा उडानटप्पू… नाही रे! आपल्यात नाही जमायचं.” विवेकला या सगळ्या गोष्टी जिवारी लागतात. तिच्या शब्दांपेक्षा ते शब्द बोलताना तिच्या चेहऱ्यावर उमळलेले विनोदी भावना त्याच्या हृदयाचे तुकडे तुकडे करून टाकतात.
दुसऱ्या दिवशी, मस्तीखोर असा विवेक पूर्णपणे शांत होऊन जातो. कोणाशी काही बोलत नाही. मागच्या बाकावर एकटाच बसलेला असतो. तन्वीला एखाद्याला नकार देण्याचा अहंकार आलेला असतो. तिच्या वागण्यात फार घमंड आलेला असतो. हे काही एक दोन दिवस चालतं. नंतर विवेकची अस्वस्थता पाहून तन्वी विचारत पडते. एका रात्री ती ठरवतेच की “चला, उद्या आपण विवेकला भेटू आणि त्याची अस्वस्थता दूर करून टाकू. बिचारा, फार दुखावला गेलाय.” पण दुसऱ्या दिवशी पासून विवेक शाळेतच दिसत नाही. त्यादिवशी तन्वी त्याला शोधण्याचा प्रयत्न करते पण शाळेच्या कोणत्याही कोपऱ्यात तो तिला सापडत नाही. त्या रात्री तन्वी त्याचाच विचारात धुंद असते. तेव्हा तिला तिच्या खाटेखालून कुजबुजण्याचा आवाज येतो. ती खाली वाकून बघते तर काय? तिथे कोणाचे तरी पाय तिला दिसून येतात. ती कसलाही वेळ न दवडता तसेच खाटेच्या वर बघते तर तिथे कोणीच नसतं. पण खाटेखाली कुणाचे तरी पाय तिला दिसून येतात. पाण्याने ओले चिंब असे ते पाय… अचानक गायब होतात.
त्या रात्रीच्या भयानक अनुभवानंतर सकाळी अर्ध्या झोपेत तन्वी शाळेत येते. मागच्या बाकावर पाहते तर काय? ओला चिंब अवस्थेत असलेला विवेक तिला दिसतो. तसाच शांत, कुणाशी काही बोलत नाही, कसलीही मस्ती नाही. एकटक समोर बघत बसलेला विवेक फार विचित्र दिसत असतो. त्याच्या दिसण्यात झालेला बदल तन्वीला जाणवत असतो. त्याला भेटण्याचा खूप प्रयत्न करते पण जेव्हा ती त्याला भेटायला जाते काही ना काही अडचण येते. असे पुढचे चार-पाच दिवस सुरू राहिले. तो तिला दिसतो. जेव्हा जेव्हा दिसतो ओला चिंब असतो. दररोज त्याच्या दिसण्यात बदल होत असतो, जणू काही त्याचे शरीर आणि चेहरा सुजत चालला आहे. दररोज ती त्याला भेटण्याचा प्रयत्न करते पण भेटता येत नाही. एके रात्री तर ती त्याच्या घरी जाऊन त्याला भेटण्याचे ठरवते.
दिवस उजाडतो, पण त्यादिवशी शाळेत विवेक तिला काही दिसत नाही. शाळा सुटताच ती तशीच आरे कॉलनी मार्गे गोरेगावला जाऊन पोहोचते. विवेकच्या घराला कुलूप असते. आजूबाजूला फार कोणी राहत नसतं. कुणाकडून तिला त्याच्याविषयी काहीच माहिती मिळत नाही. शेवटी थकून भागून तन्वी पवई तलावाच्या येथे येऊन एका बाकड्यावर येऊन बसते. त्याच्याच विचारात गुंग, एकेकाळी त्या व्यक्तीशी तिला घृणा होती आणि आज दिवसाच्या 24 तासाला ती त्याचाच विचारात गुंग आहे. याला प्रेम म्हणावे का? असा प्रश्न तिच्या मनात असतो. तितक्यात तलावाच्या मध्यभागातून किनाऱ्याजवळ एक बोट तिला येताना दिसते. ती बोट अगदी तिच्याच समोर येऊन थांबते. त्या बोटीतून एक मृतदेह काढून बाहेर ठेवला जातो. मृतदेह पाण्यात बुडून मृत पावलेला असल्यामुळे तो सुजलेला असतो आणि फुगलेला असतो. तसाच जसा विवेक दररोज दिसत होता. पण त्या मृतदेहाचा चेहरा फार काही ठळक दिसत नसल्यामुळे तो कोण आहे? याचा अंदाज लावणे कठीण होता.
तन्वी हॉस्टेलकडे रवाना होते. तिला होस्टेलच्या गेटच्या इथे विवेक असण्याचा भास होतो. चेहरा फार काही ठळक दिसत नसला तरी तो तसाच सुजलेला भासत होता, जसे ते मृतदेह दिसत होते. पण त्यावेळी तन्वीने तो एक निव्वळ भास समजून दुर्लक्ष केले.
दुसऱ्या दिवशी शाळेत एका शिक्षिकेने येऊन सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की “काल, पवई तलावाच्या इथे विवेकचे मृतदेह सापडले. विवेकने आत्महत्या केली.” हे ऐकून तन्वीच्या पायाखालची जमीन सरकली. आत्ता कुठे तिच्या मनात विवेकविषयी जागा तयार झालेली आणि विवेक या जगातूनच निघून गेला हे दुःख तिला काही पचत नव्हते. तिला हे जाणवत होते की इतके दिवस जो विवेकचा भास तिला जाणवत होता, तो भास नसून स्वतः विवेक होता. जसजसा त्याचा मृतदेह पवई तलावाच्या पाण्यात फुगत होता तस तशी त्याची आत्मा ते रूप धारण करत होती आणि तन्वीला दिसून येत होती. तन्वी तिच्या साथीदारांना या गोष्टी सांगते तेव्हा तिचे साथीदार तिला समजावतात की “आता विवेक नाही राहिला. आज संध्याकाळीच त्याच्या मृतदेहावर अंतिम संस्कार होणार आहेत. तर आता सगळं संपलंय. तो तुला आता नाही दिसणार, त्याला मोक्ष मिळणार.” हे ऐकून तन्वी तिच्या खोलीच्या दिशेने निघते. खोलीच्या आत पाय ठेवताच तिला विवेक दिसतो. पण आता विवेक भिजलेल्या अवस्थेत नसतो तर तो आगीच्या झुरख्यात पेटत असतो.
असं म्हणतात की अनेक दशके उलटून गेली तन्वीला आजही विवेक दिसतो. तो तिच्या अवतीभोवतीच असतो. त्याला तन्वी इतर कोणाच्या जवळ गेलेली आवडत नाही. त्यामुळे तन्वीचे तीनदा लग्नही मोडले आहे.