अजित पवारांचे उमेदवार बिनविरोध (फोटो- सोशल मीडिया)
अजित पवारांचे 8 उमेदवार बिनविरोध
गराध्यपदासाठी १६ पैकी २ जणांची माघार
अजित पवारांनी विरोधकांना दिला मोठा धक्का
बारामती/ अमोल तोरणे: बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक पदाचे ८ उमेदवार बिनविरोध करण्यात राष्ट्रवादीला मोठे यश मिळाले. तर नगराध्यपदासाठी १६ पैकी २ जणांनी माघार घेतली , त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी १४ जण रिंगणात असून नगरसेवक पदासाठी ७७ जणांनी माघार घेतली, त्यामुळे १४५ जणांचे अर्ज कायम राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ जण बिनविरोध करण्यात यश आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी खेळी यशस्वी होऊन विरोधकांना मोठा धक्का बसला आहे.
बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी (दि २०) बारामती मध्ये दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांनी स्वतः जोरदारपणे रणनीती आखली. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी स्वतः संपर्क करून उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले, यामध्ये बहुतांश ठिकाणी त्यांना यश आले. पक्षाचे आठ उमेदवार बिनविरोध करण्यात राष्ट्रवादीला मोठे यश मिळाले.
१८ नोव्हेंबरला छाननीच्या दिवशीच प्रभाग क्रमांक २ अ मधून अनुप्रिता तांबे निवडुन आल्या आहेत.शुक्रवारी प्रभाग क्रमांक ५ अ मधून किशोर मासाळ, प्रभाग क्रमांक ६ अ मधून धनश्री बांदल, ६ ब मधून अभिजीत जाधव, प्रभाग क्रमांक ८ अ मधून श्वेता नाळे, प्रभाग क्रमांक १७ ब मधून शर्मिला ढवाण, १८ ब मधून अश्विनी सुरज सातव, प्रभाग क्रमांक २० ब मधून आफ्रिन बागवान हे उमेदवार बिनविरोध झाले आहेत.अजित पवार गटाच्या वतीने सचिन सातव,शरद पवार गटाच्या वतीने बळवंत बेलदार,भाजपच्या वतीने अॅड.गोविंदराव देवकाते,एकनाथ शिंदे शिवसेना गटाच्या वतीने सुरेंद्र जेवरे तर बहुजन समाज पार्टीच्या वतीने काळुराम चाैधरी निवडणुकीच्या रींगणात नगराध्यक्षपदाच्या रींगणात आहेत.
बारामतीची जनता अजितदादांच्या पाठीशी: गुजर
बारामतीकर नेहमी विकासाला साथ देतात, त्यामुळेच राष्ट्रवादीचे आज ८ जण बिनविरोध झाले. या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार बारामतीकर मोठ्या मताधिक्याने निवडून देतील.
-किरण गुजर, माजी ज्येष्ठ नगरसेवक.
अर्ज मागे घेताना पवारांच्या उमेदवाराचे मोठे विधान
चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्याच्या एक दिवस आधी आणखी दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामध्ये चिपळूण नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार मिलींद कापडी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मात्र प्रभाग ९ व १० मधील जागांचा निर्णय राष्ट्रवादीने भाजप व शिंदे सेनेच्या कोर्टात टाकला आहे.






