फोटो सौजन्य - Social Media
रक्तदाबाचा जास्त त्रास केव्हा होत असेल? हिवाळ्यामध्ये कि उन्हाळ्यामध्ये? नेमकं कोणता ऋतू रक्तदाबाच्या त्रासाचा खरा मित्र असून, या त्रासाच्या वाढीत साथ देतो? अशा प्रश्न सध्याच्या काळात पडणे सामान्य आहे. यास कारण कि वातावरणातील गारवा वाढत चालला आहे. या वाढत्या थंडीचा अनेकांना त्रास होत आहे. यात रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या रुग्णांचा प्रमुख सहभाग आहे. चला तर मग जाणून घेऊयात, नेमकं कोणत्या ऋतूमध्ये रक्तदाबाचा त्रास वाढतो? हिवाळ्यात तापमान कमी झाल्यामुळे रक्ताभिसरणावर थेट परिणाम होतो, ज्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचित होतात आणि रक्ताभिसरणासाठी अधिक शक्ती लागते. याचा परिणाम म्हणून रक्तदाब (बीपी) वाढतो. वातावरणातील बदलांमुळेही रक्तदाबात चढ-उतार होऊ शकतो. डॉक्टर मनीष अग्रवाल, ज्यांना कार्डियोलॉजीमध्ये 15 वर्षांचा अनुभव आहे आणि ते कोलकात्यातील नारायणा हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ सल्लागार आहेत, यांच्या मते, रक्तवाहिन्यांवर अधिक ताण आल्याने हिवाळ्यात बीपी वाढण्याची शक्यता जास्त असते.
हिवाळ्यात रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आहेत. नियमितपणे बीपी मोजा आणि तापमानातील बदल लक्षात ठेवा. आहारात तेलकट, तुपकट पदार्थ कमी करून संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या. थंडीत शारीरिक हालचाल कमी होऊ देऊ नका, कारण हालचाल कमी झाल्यामुळे वजन वाढते, ज्याचा रक्तदाबावर परिणाम होतो. औषधांबाबत सावधगिरी बाळगणेही गरजेचे आहे. नाक मोकळे करण्यासाठी वापरण्यात येणारी डिकॉन्गेस्टंट औषधे रक्तदाब वाढवू शकतात, तर काही प्रकारच्या एंटीहिस्टामाइन औषधांमुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो. याशिवाय, काही खोकल्याच्या औषधांमध्ये रक्तदाब वाढवणारे घटक असू शकतात, त्यामुळे संयोजन औषधे वापरताना डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
रक्तदाब नियंत्रणासाठी नियमित व्यायाम, मीठाचे प्रमाण कमी ठेवणे, पुरेशी झोप घेणे, आणि तणाव कमी करण्यासाठी ध्यान किंवा योगाचा सराव करणे हे अत्यंत उपयुक्त ठरते. व्यायामामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयावर येणारा ताण कमी होतो, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. आहारात मीठाचे प्रमाण कमी ठेवल्यास शरीरात पाणी साचण्याची शक्यता कमी होते, ज्याचा सकारात्मक परिणाम रक्तदाबावर होतो. याशिवाय, पुरेशी झोप घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे, कारण झोपेच्या अभावामुळे शरीरावर ताण येतो आणि रक्तदाब वाढू शकतो. तणाव कमी करण्यासाठी ध्यान किंवा योगासारख्या उपायांचा सराव केल्याने मन शांत होते, शरीर विश्रांती घेतं, आणि रक्तदाब नैसर्गिकरित्या कमी होतो.
हिवाळ्यात रक्तदाबाचा प्रभाव कमी करण्यासाठी या उपायांबरोबरच डॉक्टरांचा सल्ला घेणे देखील आवश्यक आहे. हिवाळ्यात औषधांचा प्रभाव कमी होण्याची शक्यता असल्याने, डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचारात आवश्यक बदल करावेत. तसेच, आपली दिनचर्या सुधारून नियमित वेळा सांभाळणे, सकस आहार घेणे, आणि थंडीतही सक्रिय राहण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. या सगळ्या उपायांनी केवळ रक्तदाबच नाही तर एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत होते.