फोटो सौजन्य: iStock
पूवी कामं करण्यासाठी लोकांना ऑफिसला येणे भाग होते. परंतु आज कित्येक जण सर्रास घरून कामं करताना दिसतात. खासकरून कोरोना महामारीनंतर वर्क फ्रॉम होमचे प्रमाण वाढले आहे. जगभरात अनेक जण हल्ली घरूनच कामं करणं पसंत करतात. कित्येक कंपनीज तर आपल्या कर्मचाऱ्यांना हायब्रीड मोड ऑफर करत असतात. यामध्ये तुम्ही आठवड्यातून काही दिवसांसाठी घरून तर काही दिवस ऑफिसमधून काम करतात.
कोरोना काळात घरून काम करण्याचा ट्रेंड वाढला, ज्यामुळे अनेक लोकांना त्याचा फायदाही झाला. इतक्या दिवसांनंतरही अशा अनेक कंपनीज आहेत ज्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा पर्याय देत आहेत. परंतु दीर्घकाळ घरून काम केल्याने लोकांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून असे समोर आले आहे की मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी घरातून काम करण्यापेक्षा वर्क फ्रॉम ऑफिस एक उत्तम पर्याय आहे.
अलीकडेच जागतिक स्तरावर केलेल्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की, भारतातील ऑफिसात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा चांगले आहे. युरोप-अमेरिकेप्रमाणे भारतातील ऑफिसात कर्मचाऱ्यांना मानसिक शांती मिळते, असे देखील या अभ्यासात म्हटले आहे. ऑफिसमधून काम करणारे लोकं घरातून किंवा हायब्रीड काम करणाऱ्यांपेक्षा कमी तणावग्रस्त असतात.
युरोप आणि अमेरिकेबद्दल बोलताना या अभ्यासात असे म्हटले आहे की या ठिकाणी हायब्रीड वातावरणात काम करणाऱ्या लोकांचे मानसिक आरोग्य सुधारते. हा अभ्यास अमेरिकेतील सेपियन्स लॅबमधील वर्क कल्चर अँड मेंटल वेलबीइंगने केला आहे. या अभ्यासाअंतर्गत सुमारे 55 हजार कर्मचाऱ्यांचा या संशोधनात समावेश करण्यात आला.
या अभ्यासात असे आढळून आले की टीममध्ये काम करणाऱ्या लोकांचे मानसिक आरोग्य एकटे काम करणाऱ्यांपेक्षा चांगले होते. दुसरीकडे, जर आपण मानसिक आरोग्याच्या वाढीबद्दल बोललो तर इतर देश या बाबतीत भारतापेक्षा चांगले आहेत.