IVF कोणत्या वयात करणे योग्य (फोटो सौजन्य - iStock)
पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हल्ली बहुतांश जोडपी इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) चा पर्याय निवडताना पहायला मिळतात. एककीकडे आयव्हीएफ अनेक जोडप्यांसाठी आशेचे किरण ठरत असताना दुसरीकडे वय हे त्या प्रक्रियेच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे दिसून येते. इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) ही एक प्रक्रिया आहे जिथे स्त्रीबीज प्रयोगशाळेत शुक्राणूंनी फलित केली जातात आणि नंतर गर्भाशयात ठेवली जातात. यामुळे प्रजनन समस्यांना तोंड देणाऱ्या जोडप्यांना मूल होण्यास आणि पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत होते.
आयव्हीएफ विशेषतः अशा महिलांसाठी उपयुक्त आहे ज्यांच्या फॅलोपियन ट्युब ब्लॉक झालेल्या आहेत, स्त्रीबीजांची संख्या आणि दर्जा खालावणे, पॉलीसिस्टिक अंडाशय सिंड्रोम (पीसीओएस) किंवा वंध्यत्वासारख्या आजारांचे निदान झाले आहे. हे शुक्राणूंची संख्या कमी असलेल्या पुरुषांकरिता देखील फायदेशीर ठरते. ज्या वयात स्त्री आयव्हीएफ करते त्यावर त्या प्रक्रियेचे यश अवलंबून असते. डॉ. अश्विनी राठोड, सल्लागार प्रसूतीतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि वंध्यत्व विशेषज्ञ, अंकुरा महिला आणि बाल रुग्णालय, पुणे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
World IVF Day: आयव्हीएफला सुरुवात करण्याआधी मानसिक तयारी किती गरजेचे, तज्ज्ञांनी दिल्या खास टिप्स
जाणून घ्या फरक
३० व्या वर्षी आयव्हीएफ: ज्या महिला ३० व्या वर्षी आयव्हीएफ करण्याचा पर्याय निवडतात त्यांना चांगले परिणाम मिळतात. या वयात स्त्रीबीज निरोगी असतात, हार्मोन्सची पातळी अधिक स्थिर असते आणि शरीर प्रजननासंबंधी औषधांना चांगला प्रतिसाद देखील देते. या वयात गर्भपात आणि अनुवांशिक समस्यांचा धोका देखील कमी असतो. सरासरी, या वयोगटात आयव्हीएफ यशस्वी होण्याचे प्रमाण अधिक असते.
४० व्या वर्षी केले जाणारे आयव्हीएफ: या वयात आयव्हीएफ प्रक्रिया शक्य आहे, परंतु अनेक जोडप्यांसाछी ती आव्हानात्मक ठरु शकते. जेव्हा एखादी महिला चाळीशीत पोहोचते तेव्हा तिच्या अंड्यांची संख्या आणि गुणवत्ता नैसर्गिकरित्या वयानुसार कमी होते आणि गुणसूत्र विकृतींची शक्यता वाढते. अशावेळी अधिक आयव्हीएफ चक्रांची आवश्यकता भासू शकते आणि काही महिलांना दात्याच्या स्त्रीबीजांची आवश्यकता भासू शकते. या वयात गर्भपात आणि गर्भधारणेच्या गुंतागुंतीचा धोका देखील जास्त असतो. तरीही, ४० व्या वर्षीच्या अनेक महिला योग्य वैद्यकीय मार्गदर्शनाने गर्भधारणा साध्य करु शकतात.
महत्त्वाच्या टिप्स:
आयव्हीएफ उपचार सुरू करण्यापूर्वी, अशा तज्ज्ञांना भेटणे आवश्यक आहे जे तुम्हाला प्रक्रियेबद्दल योग्य मार्गदर्शन करतील. तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्वरीत प्रजनन क्षमता मूल्यांकन करा, निरोगी वजन आणि योग्य जीवनशैली बाळगा, धूम्रपान, मद्यपान आणि कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन टाळा, योग आणि ध्यान करून तणावावर मात करा, नियमितपणे डॉक्टरांच्या संपर्कात रहा, दररोज व्यायाम करून शारीरिकदृष्ट्या सक्रिय रहा आणि जंक फुड, प्रक्रिया केलेले पदार्थ, तेलकट आणि हवाबंद डब्यातील पदार्थ खाणे टाळा. जर तुम्हाला डॉक्टरांनी शिफारस केली असेल तर आयव्हीएफ उपचार घेण्यास अजिबात संकोच बाळगू नका.
World IVF Day: आयव्हीएफ म्हणजे काय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेली सविस्तर माहिती