आयव्हीएफ म्हणजे काय?
२५ जुलैला जगभरात सगळीकडे जागतिक आयव्हीएफ दिन साजरा केला जातो. आईवडील होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक जोडप्यांसाठी हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. जगातील अतिशय सुंदर भावना म्हणजे आई होणे. पण बऱ्याचदा वाढलेले वय, जीवनशैलीतील चुकीच्या सवयी, आहारात होणारे बदल, धूम्रपान किंवा इतर अनेक गोष्टींचा परिणाम पुरुषांपेक्षा महिलांच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे बऱ्याचदा गर्भधारणेमध्ये अनेक अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते.अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घेतले जातात. सगळ्यांची टेस्ट ट्यूब बेबीबद्दल ऐकले असेलच. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आयव्हीएफ म्हणजे काय? आयव्हीएफ प्रक्रिया नेमकी कशी असते? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
आयव्हीएफ करण्याआधी महिला आणि पुरुषांच्या विविध अवयवांची तपासणी केली जाते. त्यामध्ये मूत्रपिंड आणि यकृताचे कार्य, रक्तातील साखर, थायरॉईड, रक्त चाचण्या, मेटाबॉलिक प्रोफाइल इत्यादी अवयवांची तपासणी केली जाते. तपासणी केल्यानंतर काही असंतुलन आढळून आल्यास औषध उपचार करून शरीर संतुलित केले जाते. त्यानंतर शरीर योग्यरीत्या बरे झाल्यानंतर आयव्हीएफ प्रक्रिया केली जाते.
आयव्हीएफ प्रक्रिया करण्यासाठी महिलांना मासिक पाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आयव्हीएफ सेंटरमध्ये बोलावले जाते. त्यानंतर आयव्हीएफसाठी आवश्यक असलेल्या सर्व रक्त चाचण्या, अल्ट्रासाऊंड केले जातात. त्यानंतर हार्मोनल इंजेक्शनची प्रक्रिया सुरू होते. हे इंजेक्शन नियमित दिले जाते, ज्यामुळे अतिशय सामान्य वेदना होतात. तसेच हे इंजेक्शन महिलांच्या पोटावर किंवा मांड्यांवरसुद्धा देतात.
इंजेक्शन दिल्यानंतर साधारणपणे 10 दिवसांत फॉलिकल्स अंडी तयार होतात. त्यानंतर सहाव्या दिवशी पुन्हा एकदा रक्त तपासणी आणि अल्ट्रासाऊंड केले जाते. ज्यामध्ये इंजेक्शन वाढवायचे की कमी करायचे, याबद्दल ठरवले जातात. अंडी तयार होण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी लागतो. ज्यावेळी अंडी पूर्णपणे तेव्हा ट्रिगर इंजेक्शन दिले जाते. 36 तासांनंतर अंडी काढून टाकली जातात, ज्याला एग रिट्रीव्हल म्हणतात.आयव्हीएफ प्रक्रिया करताना शरीरावर कोणतेही टाके किंवा कट दिले जात नाहीत. एका विशेष प्रकारच्या योनीच्या अल्ट्रासाऊंड प्रोबच्या मदतीने, महिलेच्या योनीतून अंडी काढली जातात. ही प्रक्रिया करताना महिलांना वेदनाशामक औषध दिले जातात.
महिलांच्या शरीरातून काढलेली अंडी थेट गर्भतज्ज्ञाकडे सोपवली जातात. त्यानंतर ते द्रवापासून वेगळे केले जाते इन्क्यूबेटरमध्ये सुरक्षित ठेवले जाते. पुरुष जोडीदाराकडून घेतलेल्या वीर्याची सुद्धा चाचणी केली जाते.शुक्राणू कमकुवत असतील तर ICSI (इंट्रासाइटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन) तंत्राचा वापर करून, प्रत्येक शुक्राणू थेट अंड्यात टोचले जातात.