कर्जत : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वेक्षण करण्यात आलेल्या कर्जत तालुक्यातील 1207 जणांच्या DPR ला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघात जास्तीत जास्त प्रमाणात नागरिकांना घरकुल मंजूर व्हावे यासाठी विशेष प्रयत्न केले होते.
तसेच कर्जत तालुक्यातील एकूण 400 जणांचे सर्वेक्षण करण्यात येणार होते. परंतु, आमदार रोहित पवार यांनी याबाबत स्वतः विशेष लक्ष घालून 1207 गरजू असलेल्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात यावे या दृष्टीने प्रयत्न केले. त्यानुसार सर्वेक्षण केल्यानंतर 1207 जणांच्या डीपीआरला बुधवारी केंद्र सरकारच्या झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी कर्जत नगर पंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव साहेब व कर्जतच्या सर्व नगरसेवकांनी आमदार रोहित पवारांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रयत्नातून आता प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळणार आहे. यापूर्वी डिसेंबर महिन्यात जामखेडमधील DPR लाही त्या ठिकाणी मंजुरी मिळाली होती.
[read_also content=”राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे : चंद्रकांत पाटील https://www.navarashtra.com/maharashtra/raj-thackeray-is-an-independent-personality-chandrakant-patil-nrdm-268857.html”]
घरकुल योजनेनुसार प्रत्येकी अडीच लाख रुपये म्हणजे कर्जत तालुक्यातील 1207 लाभार्थ्यांसाठी 30 कोटी 17 लाख 50 हजार रुपये एवढी रक्कम घरकुलासाठी मिळणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण झाल्याने केंद्र सरकारकडूनही याबाबत फेर तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करून कर्जत तालुक्यातील विविध भागात जाऊन तपासणी देखील करण्यात आली होती. त्यानंतरही मतदारसंघात खरंच घरकुलाची गरज असल्याचे त्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने आता केंद्र सरकारने सादर करण्यात आलेल्या डीपीआरला मान्यता दिली आहे. आमदार रोहित पवार यांनी या सर्व बाबींमध्ये विशेष लक्ष घालून मतदारसंघात मोठ्या प्रमाणात घरकुल मंजूर व्हावे असे प्रयत्न केले होते अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे या माध्यमातून पाहायला मिळत आहे.