US-Saudi deal: व्हाईट हाऊसमध्ये ऐतिहासिक करार; ट्रम्प यांनी क्राउन प्रिन्सची 'दूरगामी' रणनीती, F-35 च्या विक्रीला मान्यता ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
US-Saudi nuclear deal : अमेरिका (America) आणि सौदी अरेबियामधील(Saudi Arabia) दीर्घकालीन धोरणात्मक संबंधांना नवा ऐतिहासिक टप्पा गाठत मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये एक महत्त्वपूर्ण बहुआयामी करार करण्यात आला. सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (MBS) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donal Trump) यांच्यात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीदरम्यान नागरी अणुऊर्जा सहकार्य आणि अत्याधुनिक F-35 लढाऊ विमानांच्या विक्रीसह संरक्षण क्षेत्रातील मोठे निर्णय अंतिम करण्यात आले.
व्हाईट हाऊसने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, “नागरी अणुऊर्जा सहकार्यासाठीची ही संयुक्त घोषणा दोन्ही देशांमध्ये पुढील अनेक दशकांसाठी अब्जावधी डॉलर्सच्या अणुऊर्जा भागीदारीचा कायदेशीर पाया ठरेल.” या करारानुसार सौदी अरेबियाला अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी अमेरिकन तंत्रज्ञान, सुरक्षा मानके आणि प्रगत प्रणालींचे सहकार्य मिळणार आहे.
या बैठकीतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अमेरिकेच्या पाचव्या पिढीतील F-35 स्टेल्थ लढाऊ विमानांच्या विक्रीला मान्यता. हे विमाने जगातील सर्वात प्रगत आणि उच्च सुरक्षा क्षमता असलेले फायटर जेट मानले जातात. यासोबतच अमेरिकेकडून अंदाजे 300 प्रगत टँकांची विक्री करण्यासही मान्यता दिली गेली आहे. या संरक्षण पॅकेजमुळे सौदी अरेबियाचे संरक्षण सामर्थ्य मोठ्या प्रमाणात वाढणार असून मध्य-पूर्वेतील सुरक्षा संतुलनावरही त्याचा प्रभाव पडणार आहे. संरक्षण करारांच्या या मोठ्या टप्प्यामुळे अमेरिकेच्या औद्योगिक क्षेत्रातही हजारो रोजगार निर्माण होतील, असे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध
व्हाईट हाऊसच्या माहितीपत्रकानुसार, हा एक बहुआयामी करार असून त्यात नागरी अणुऊर्जा, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, महत्त्वाची खनिजे, पुरवठा साखळी आणि तंत्रज्ञान सुरक्षा अशा अनेक क्षेत्रांचा समावेश आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयक सामंजस्य करारामुळे सौदी अरेबियाला अमेरिकन एआय प्रणालींमध्ये प्रवेश मिळेल, तर दुसरीकडे अमेरिकन तंत्रज्ञानाची सुरक्षितता आणि बौद्धिक संपदा संरक्षित राहील. या बैठकीत ट्रम्प यांनी असेही नमूद केले की, रियाधने जाहीर केलेली 600 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक भविष्यात 1 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढू शकते, ज्यामुळे अमेरिका–सौदी आर्थिक सहकार्याला नवा वेग मिळणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘रशियासोबत व्यापार केला तर…’ ; डोनाल्ड ट्रम्प यांची जगभरातील देशांना पुन्हा उघड धमकी
अमेरिका आणि सौदी अरेबियामधील सुरक्षा सहकार्याला 80 वर्षांहून अधिक काळ झाला असून हा करार दोन्ही देशांमधील विश्वास अधिक दृढ करणारा आहे. मध्य-पूर्वेतील सुरक्षा मजबुतीकरण, ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य आणि प्रादेशिक स्थैर्य यासाठी हा करार महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास व्हाईट हाऊसने व्यक्त केला आहे.
Ans: नागरी अणुऊर्जा प्रकल्पांसाठी तंत्रज्ञान, सुरक्षा मानके आणि दीर्घकालीन सहकार्याची व्यवस्था.
Ans: ही पाचव्या पिढीतील सर्वात प्रगत स्टेल्थ विमाने असून सौदीचे संरक्षण सामर्थ्य मोठ्या प्रमाणात वाढणार.
Ans: रोजगार वाढ, अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक आणि मध्य-पूर्वेतील धोरणात्मक प्रभाव अधिक मजबूत होणार.






