माझ्या मतदारसंघात १३ हजार दुप्पट मते...; बच्चू कडूंचा निशाणा
Akola News: ” निवडणुका लढवाव्यात ती नाही हा विचार माझ्या मनात आहे. मला वाटतं मतदान केंद्रांची काही गरजच नाही, थेट भाजपच्या कार्यालयात मतपेट्या ठेवून भाजपच्याच कार्यकर्त्यांनी मतदान करून त्यांनीच नगरसेवक निवडून आणावेत. निवडणुकीचा खर्च तरी कशासाठी करायचा. माझ्या मतदारसंघात १३ हजार नावे दुप्पट आढळली आहेत. लोकशाहीचे पतन सुरू आहे. त्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाला पत्र देणार आहोत,” अशा शब्दांत प्रहार संघटनेचे नेते व आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.
शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या डीवायएसपी अनंत कुलकर्णींचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यावर प्रतिक्रीया देताना बच्चू कडू म्हणाले, “ज्या अधिकाऱ्याने शेतकऱ्याला लाथ मारली, त्यालाही लाथ बसली पाहिजे. केवळ निलंबनाने काही होणार नाही, त्या शेतकऱ्यानेच त्याच्या ढुंगणावर लाथ मारली पाहिजे. नाहीतर आम्ही त्या डीवायएसपीच्य ढुंगणावर लाथ मारू, पंकजा मुंडे ने देखील हे समजायला हवं होतं पंकजा मुंडेंनी देखील निषेध व्यक्त करायला हवा होता. आमचे मुख्यमंत्री हुशार आहेत, गृहमंत्रीही तेच आहेत, आणि त्यांचे पोलीसही असेच वागत आहेत.
शिंदेंना लॉटरी लागली ते कोणी लावून दिलं हे नाईकांना माहिती आहे. लॉटरी सामान्य माणसाला कधी लागत नाही; ती फक्त मंत्री आणि उद्योगपतींनाच लागते.”असा टोलाही त्यांनी लगावला. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या युतीबाबत संजय राऊत यांनी केला होता. त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना बोलताना बच्चू कडू म्हणाले, “दोन ठाकरे एकत्र आले तरी शेतकऱ्याचं काय? मुंबई जिंकली तरी आमच्या शेतमालाला भाव नाही, शिक्षण-आरोग्याचा प्रश्न सुटला नाही. मग आमचं काय भलं होणार?”
शिंदे–पवार दिल्ली दौऱ्यावर खिल्ली उडवत बच्चू कडू म्हणाले, ”उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित दादा उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने दिल्लीला जाणार म्हणतात. त्यांना जावंच लागेल, नाही गेले तर काय करणार? इथे ते वाघ आहेत पण दिल्लीला गेल्यावर त्यांना शेपटी हलवावीच लागते,” असा उपरोधिक टोला कडूंनी लगावला.
सुप्रीम कोर्ट आणि ईडीवर भाष्य करत कडू यांनी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे कौतुक केले. “गवईंमुळे तरी वाटतं की सुप्रीम कोर्ट संविधानाचा आदर करेल. ईव्हीएम व ईडी भाजपने ताब्यात घेतल्या आहेत. लोकशाही संपवून हुकूमशाहीकडे देश ढकलला जातोय,” असा आरोपही बच्चू कडूंनी यावेळी केला.
तसेच,बांगलादेशने निर्यात बंदी उठवली असली तरी शेतकऱ्यांना त्याचा काही उपयोग नसल्याचे कडूंनी स्पष्ट केले. “कधी भाव वाढतो तेव्हा शेतकऱ्याच्या हातात माल नसतो, भाव कमी झाला की शेतमाल दारात सडतो. कायमस्वरूपी उपाय हवा. पेरणी ते कापणीपर्यंतचा ६० टक्के खर्च सरकारने उचलला तर शेतकऱ्यांची हानी कमी होईल. हमीभावाची ताकद राहिलेली नाही,” असे त्यांनी सांगितले.