संग्रहित फोटो
चिपळूण : काँग्रेस पक्षाने देशात सर्व धर्म समभावाची शिकवण दिली आहे. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन काँग्रेस पक्ष राजकारण करत आला आहे पण मागील १२ वर्षापासून भारतीय जनता पक्ष देशात हिंदु मुस्लीम वाद निर्माण करून विभाजनाचे राजकारण करत आहे. सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा हे षडयंत्र हाणून पाडा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले.
कोकण विभागातील लोकप्रतिनिधींच्या तीन दिवसीय निवासी कार्यशाळेची सांगता झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी खासदार हुसेन दलवाई, आमदार भाई जगताप, माजी आमदार मोकल, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड गणेश पाटील, प्रवक्ते हनुमंत पवार, प्रदेश काँग्रेसच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आशुतोष शिर्के, रत्नागिरी उत्तर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनललक्ष्मी घाग, प्रदेश उपाध्यक्ष आबा दळवी, प्रदेश सरचिटणीस गुरबिंदर सिंग बच्छर, शशांक बावचकर, ॲड. श्रद्धा ठाकूर, रत्नागिरी जिल्हा समन्वयक सुरेश कातकर यांच्यासह प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिपळूणमधील शिबिराच्या सांगता कार्यक्रमाला ऑनलाईन संबोधित करताना प्रभारी रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, निवडणुकीत जय पराजय होत असतात, पराभवाने खचून न जाता काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर द्या. तालुका, जिल्हा, ब्लॉक, वार्ड, बुथ स्तरावर संघटना मजबूत करा व आपले नेते राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे हात मजबूत करा. काँग्रेसचा शिपाई म्हणून लढा, काँग्रेस पक्षाला नक्की गतवैभव प्राप्त होतील, असा विश्वास चेन्नीथला यांनी व्यक्त केला.
शिबिरानंतर झालेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, चिपळूणमधील शिबिरातून नेतृत्व विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. या शिबिराने कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळेल. आघाडीचे राजकारण ही अपरिहार्यता आहे पण त्याचा कोकणात काँग्रेस पक्षाला फटका बसला आहे. आगामी काळात कोकणात पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. त्याच अनुषंगाने कोकण विभागात हे तीन दिवसाचे शिबिर घेण्यात आले. या शिबिरातून तळागाळातील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळेल असे सपकाळ म्हणाले.
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या संगमेश्वर येथील स्मारकाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. मुख्यमंत्री व मंत्र्यांनी स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचे स्मारक करण्याच्या घोषणा अनेकवेळा केल्या पण त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही, हे भाजपा महायुती सरकारच्या करंटेपणाचे लक्षण आहे. संभाजी महाराज यांचे स्मारक न करण्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कशाची भिती वाटत आहे, संभाजी महाराजांच्या स्मारकामुळे मुख्यमंत्र्यांच्या ‘विचारांना’ अडचण होईल, अशी भिती तर त्यांना वाटत नाही ना, असा प्रश्न हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.






