(फोटो- istockphoto)
भंडारा : तालुक्यातील अड्याळ पोलिस ठाणे हद्दीतील कलेवाडा येथे गुरुवारी (दि. 27) मध्यरात्री एक ऍम्बुलन्स आली आणि कलेवाडा, पहेला, डोंगरगाव येथून 14 शेळ्या घेऊन पळाल्याची तक्रार शेळी मालकांनी पोलिसांत केली आहे. त्यामुळे परिसरातील शेळीपालक चोरट्यांच्या दहशतीत आहेत.
कलेवाडा येथील लीलाधर तुळशीराम भोयर यांच्या गोठ्यातील 10 शेळ्या, पहेला येथून 1, तर डोंगरगाव येथून 3 अशा एकूण 14 शेळ्या लांब पल्ल्याच्या ऍम्बुलन्ससारख्या दिसणाऱ्या वाहनात डांबून पळाले. शेळी पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांचे पथक चोरट्यांचा शोध घेण्यास रवाना झाले आहे. या घटनेचा कसून तपास सुरू असल्याची माहिती यावेळी ठाणेदार धनंजय पाटील यांनी दिली.
आजपर्यंत ज्या गावात चोरीची एकही घटना घडत नव्हती. तेथे गोठ्यात बांधलेल्या 14 शेळ्या सोडून वाहनात डांबून चोर पसार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दिवसभर शेतात काम, मोलमजुरी अनेक काबाडकष्ट करत असल्याने रात्री निवांत झोपी जातात. याचाच फायदा घेत चोरट्यांनी तीन गावांतून 14 शेळ्या चोरून पळ काढला.
मलकापुरात सोनसाखळी चोरीची घटना
मलकापूर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील 29 जानेवारी रोजी चेन स्नॅचिगची घटना घडली होती. त्यावर पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी सोनसाखळी चोरणाऱ्याचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांच्या पथकाने बुधवारी मलकापूर शहर हद्दीत चेन स्नॅचिंगमधील आरोपीला अटक केली.