वसई । रवींद्र माने : स्वस्त दरात फ्लॅट मिळवून देण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखा-३ ला यश आले आहे. त्याने अशा प्रकार दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
पोलीस आयुक्तालय हद्दीतील वसई-विरार भागात स्वस्त दरात फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याची जाहिरात देऊन सामान्य नागरीकांची फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाली होती. या घटनांची वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घेऊन या टोळीचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने गुन्हे शाखेने तपास केला असता, संतोष ठाकूर यांची राम पाटील (खरे नाव – रामसिग देवरा), स्वप्नील हळदणकर, अमोल भोईर, राहुल सिंग (खरे नाव – सुरज दुबे) आणि अरविंद दुबे यांनी आपसांत संगणमत करुन फ्लॅट देण्याच्या बहाण्याने ७ लाख ८३ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा-३ करीत असताना, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी रामसिंग जालमसिंग देवरा बंगली हॉस्पिटल जवळ येणार असल्याचे कळले. त्यानुसार त्याला छापा मारून ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केल्यावर त्याच्या विरोधात अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात यापुर्वीच तुळींज पोलीस ठाण्यात ४२०,४६८,४७१,३४ कलमान्वये गुन्हा दाखल असल्य़ाची माहिती मिळाली. रामसिंग याने त्याच्या साथिदारांशी संगनमत करून स्वस्त दरात घर विकत घेऊ इच्छीत सामान्य नागरीकांना हेरुन त्यांची सुमारे २ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले. रामसिंगचा पूर्वइतिहास पडताळून पाहिल्यावर त्यांच्या विरुद्ध अर्नाळा पोलीस ठाण्यात ४, नालासोपारा पोलीस ठाण्यात २ आणि तुळींज पोलीस ठाण्यात एक असे फसवणूकीचे ७ गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे.
रामसिंग जालमसिंग देवराला अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले असता, २ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली आहे. ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, उपनिरीक्षक अभिजित टेलर, उमेश भागवत, हवालदार अशोक पाटील, सचिन पेरे, मुकेश तटकरे, सागर चारवकर, मनोज सकपाळ, सचिन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे, संतोष चहाण यांनी केली.