Maharashtra Breaking News LIVE Updates Today:
IMD Alert: दिल्ली, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा
नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. नैऋत्य मोसमी पावसाने पश्चिम हिमालयीन प्रदेशात हाहा:कार उडाला आहे. जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या बहुतांश भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसात जम्मू आणि काश्मीरमधील गांदरबल येथे ढगफुटी झाली. मुसळधार पावसामुळे डोंगराळ राज्यांमध्ये भूस्खलन झाले, ज्यामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली.
उत्तराखंडमधील पिथोरगड येथे बेली ब्रिज कोसळल्याने सीमावर्ती भागांशी संपर्क तुटला. पंजाब, हरियाणा आणि चंदीगडसह उत्तर भारतातील मैदानी प्रदेशातही चांगला पाऊस झाला. हवामान विभागाने अनेक भागांमध्ये सोसाट्याचा वारा, मेघगर्जना आणि विजांचा इशारा देत लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वायव्य भारतात किमान पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.
20 Aug 2026 09:36 AM (IST)
Monsoon Rain Deficit: गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे नागपूर जिल्ह्यात पावसाची तब्बल ३१ टक्के तूट निर्माण झाली आहे. ऐन वाढीच्या काळात पावसाने उसंत घेतल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाअभावी शेतातील पिके सुकू लागली असून बळीराजा पावसाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहे.
पावसाच्या या प्रदीर्घ खंडामुळे सोयाबीन, कापूस, तूर आणि धान यांसारख्या मुख्य पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. पिकांवर किडींचा मोठा प्रादुर्भाव झाला असून पाने खाल्ली जात आहेत. वेळेवर पाऊस न आल्यास पिकांचे अतोनात नुकसान होऊन उत्पादनात मोठी घट येण्याची भीती वर्तवली जात आहे.
20 Aug 2026 09:25 AM (IST)
Gen Z Campus Outreach: केंद्र सरकारकडून जेन झेड शी थेट संवाद वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने एक नवी योजना आखली असून, या अंतर्गत दररोज एका केंद्रीय मंत्र्याने एका विद्यापीठाला भेट देण्याचे नियोजन केले जात आहे. तरुणांच्या समस्या जाणून घेणे आणि विविध राष्ट्रीय मुद्द्यांवर त्यांचे विचार समजून घेणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
NEET परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर देशभरातील तरुणांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतरवर शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी झालेल्या आंदोलनात तरुण पिढी मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. या सर्व घडामोडींनंतर तरुणांमधील असंतोष दूर करण्यासाठी आणि त्यांच्याशी थेट संपर्क प्रस्थापित करण्यासाठी मोदी सरकार हा महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करणार असल्याचे समजते.
20 Aug 2026 09:20 AM (IST)
Mumbai Crime News : दारूच्या नशेत बाथरूममध्ये पाय घसरून पडून सुनेचा मृत्यू झाल्याचा खोटा बनाव करणाऱ्या सासूचा मुंबईतील पंतनगर पोलिसांनी अखेर पर्दाफाश केला आहे. जुन्या वादाच्या रागातून सासूने माजी मोलकरणीच्या कुटुंबाला तब्बल ३ लाख रुपयांची सुपारी देऊन दुबईहून परतलेल्या ३५ वर्षीय सुनेची निर्घृण हत्या घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी मुख्य आरोपी सासू धनलक्ष्मी गंजी (६०) हिच्यासह सुपारी घेणारी माजी मोलकरीण मंगलाबाई जाधव (४५), शिवानी जाधव (२१), सुरेश जाधव (४६) आणि साजन जाधव (१९) या ५ जणांना अटक केली आहे. न्यायालयाने सासू धनलक्ष्मीला २४ ऑगस्टपर्यंत, तर मोलकरीण आणि तिच्या कुटुंबाला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
20 Aug 2026 09:15 AM (IST)
West Bengal Politics: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मोठे राजकीय संकट झेलणाऱ्या तृणमूल काँग्रेसने अखेर जोरदार पुनरागमन केले आहे. निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवत ममता बॅनर्जी यांच्या सत्तेला सुरुंग लावला होता. सत्तांतरानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडून आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला होता, तर तब्बल २० खासदारांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती.
ममता बॅनर्जी यांच्या हातातून पक्ष निसटत असल्याचे चित्र निर्माण झाले असतानाच, अवघ्या दोन महिन्यांत तृणमूलने पुन्हा एकदा कमबॅक करत भाजपला मोठा धक्का दिला आहे. सतत बसणाऱ्या राजकीय धक्क्यांनंतर तृणमूल काँग्रेसने मारलेल्या या मुसंडीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
20 Aug 2026 09:05 AM (IST)
Shivsena Symbol Case Supreme Court: शिवसेना पक्ष आणि 'धनुष्यबाण' निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी सुरू असून ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तिवाद केला. राजकीय पक्ष (Political Party) हा कायमस्वरूपी असतो, तर विधिमंडळ पक्ष (Legislative Party) हा केवळ ५ वर्षांच्या कालावधीपुरता मर्यादित असतो; त्यामुळे केवळ विधिमंडळातील संख्याबळाच्या आधारावर मूळ पक्ष ठरवणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे, असा मुख्य दावा ठाकरे गटाकडून मांडण्यात आला.
कपिल सिब्बल यांनी न्यायालयात स्पष्ट केले की, राजकीय पक्ष ही मूळ संस्था असते आणि तिच्या अंतर्गत विधिमंडळ पक्ष कार्य करतो. निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी आमदारांच्या संख्येवर (विधिमंडळ पक्ष) भर देऊन एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला, जो पूर्णपणे चुकीचा आहे. जर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाला दिले जात नसेल, तर ते तातडीने गोठवले (Freeze) जावे, अशी मागणी सिब्बल यांनी कोर्टात केली.






