अमरावती : जिल्ह्यात एका गावातील शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चक्क नावेने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. अमरावती जिल्ह्यात (Amravati District) सध्या पावसाची संततधार सुरू आहे. त्यातच अप्पर वर्धा धरणाचे (Upper Wardha Dam) सर्व तेरा दरवाजे उघडण्यात आलेत. त्यामुळे वर्धा नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आलेला आहे. अनेक नदीकाठच्या गावांना पुराने वेढा घातला आहे. यातच नमस्कारी गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. नमस्कारी नामक गावातील विद्यार्थ्यांना अतिशय धोकादायक पद्धतीने वर्धा नदी पात्र (Wardha River basin) ओलांडून चक्क नावेत बसून शाळेत (On boat to school ) जावे लागत आहे. येथील विद्यार्थ्यांना पाचवीनंतर दुसऱ्या गावी पुढील शिक्षणासाठी जावे लागते. त्यामुळे शिक्षणाचा प्रश्न येथील विद्यार्थ्यांसाठी बिगट झाला आहे.
नमस्कारी गावातील २५ विद्यार्थी दररोज वर्धा नदी ओलांडून भारसवाडी ( Bharaswadi ) येथे शिक्षणासाठी जातात. मात्र, वर्धा नदी सध्या दुथडी भरून वाहत असल्याने विद्यार्थ्यांना वीस रुपये देऊन नावेतून शाळेपर्यंतचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने एक नाव देऊन विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा जॅकेटची (Safety jacket ) व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. नमस्कारी गावात नीट रस्ते नाहीत. त्यामुळे जीव धोक्यात घालून विद्यार्थी नदी पात्र ओलांडून दुसर्या ठिकाणी नावेत बसून शाळेमध्ये जातात.
एका गावातून दुसऱ्या गावात जाणे हे पावसाळ्यात जिकरीचे काम आहे. त्यात नद्यांना पूर येत असल्याने नाव केव्हा पुरात वाहून जाईल काही सांगता येत नाही. अशावेळी विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठीचा प्रवास जीवघेणा ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दुर करण्यासाठी त्यांना सुरक्षा जॅकेट जिल्हा प्रशासनाने त्वरित पुरविले पाहिजे. अन्यथा घरून गेलेला मुलगा सायंकाळी नदी ओलांडून पुन्हा परतेल की, नाही ही चिंता पालकांनाही पावसाळ्यात कायम सतावत आहे.






