दीड कोटींची डिफेंडर कार कोणत्या कामातील कमिशन? संजय गायकवाडांचे स्पष्टीकरण
आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वादग्रस्त ठरणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay gaikwad)नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. महत्वाची बाब म्हणजे, बुलढाण्याचे भाजप जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांनीच त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय गायकवाड यांनी दीड कोटींची नवी कोरी डिफेन्डर कार कोणत्या कामातील कमिशन आहे, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
भाजप जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांच्या या आरोपांना आमदार संजय गायकवाड यांनी आमदार गायकवाड यांनी या डिफेन्डर कारबाबत (Car)स्पष्टीकरण दिलं आहे. संजय गायकवाड म्हणाले, जिल्ह्यात आणि माध्यमांमध्ये ज्या गाडीची चर्चा सुरू आहे. ती गाडी निलेश ढवळे या कंत्राटदाराची आहे. तो माझा नातेवाईकही असून पक्षाचा कार्यकर्ताही आहे. निलेशने १०० टक्के कर्ज काढून ती गाडी घेतली आहे. मी काही दिवस वापरण्यासाठी ती गाडी माझ्याकडे बोलावली आहे. माझ्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडींवर आमदाराचे चिन्ह लावले आहे. पण ज्यांनी माझ्यावर कमिशनचे आरोप केले, त्या कुत्र्यांना उत्तर देण्याची गरज नाही.
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधीच बुलढाण्यात महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. भाजप आणि शिंदे गटात नवा वाद उफाळून आला आहे. एकमेकांवर कुरघोड्या करत आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे आमदार संजय गायकवाड यांच्याकडे असणाऱ्या दीड कोटींच्या लक्झरी लँड रोव्हर डिफेंडर कारवरून महायुतीत हा नवा वाद उफाळला आहे.
पुणे-बंगळूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; कोंडी सोडवण्यासाठी खुद्द पोलिस उपअधीक्षक उतरले रस्त्यावर
दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांनी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. “जर बुलढाणा नगराध्यक्षपदासाठी भाजपचाच विचार होत असेल तरच युती शक्य आहे. बेडकासारखी भाषणे देत ‘युती पाहिजे… युती पाहिजे’ म्हणणाऱ्या एका लोकप्रतिनिधीने कालच दीड कोटी रुपयांची ‘डिफेंडर’ गाडी आणली आहे. ती एका ठेकेदाराच्या नावावर असून ती कोणत्या कामातील कमिशनमुळे मिळाली, याची चौकशी व्हावी,” अशी मागणी त्यांनी केली.
तसेच, “मतदारांना वेश्येपेक्षा वाईट असे संबोधणाऱ्या त्या लोकप्रतिनिधीला जनता नक्कीच नाकारेल. त्यामुळे युतीचा विचार करायचा असेल, तर तो केवळ भाजपच्या नेतृत्वाखालीच व्हावा; अन्यथा युती शक्य नाही,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.