अमरावती : एका अल्पवयीन मुलीला फ्लॅटवर बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. तिचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून 1 लाख रुपये रोख व 80 ग्रॅम सोने उकळण्यात आले. त्यानंतरही तिला 10 ते 12 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. ही घटना 21 डिसेंबर रोजी नांदगाव पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी कार्तिक संजीव पुसदकर (20) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला 26 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
कार्तिक हा पीडित मुलीच्या परिचयातील आहे. कार्तिकने तिला मोबाइलवर कॉल करून नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीतील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये बोलावले. तेथे त्याने पीडित मुलीला बळजबरीने धमकावून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याचवेळी कार्तिकने तिचे काही फोटो काढले. पुढे ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर त्याच फ्लॅटमध्ये वारंवार अत्याचार करण्यात आला.
जानेवारी 2023 मध्ये कार्तिकने तिला छत्री तलाव येथे बोलावून फोटो व्हायरलची धमकी दिली. तिच्याकडून रोख 1 लाख रुपये घेतले. आठवड्याभरानंतर पुन्हा तिच धमकी देऊन त्याने तिला 80 ग्रॅम सोने घेऊन छत्री तलाव येथे बोलावून घेतले. कार्तिकच्या हा त्रास असह्य झाल्याने व पैशांची मागणी वाढतच असल्याचे पाहून पीडित मुलीने याबाबत आई-वडिलांना माहिती दिली. त्यानंतर तिने नांदगाव पेठ ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी कार्तिकविरुद्ध विनयभंग, बलात्कार, खंडणी व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.