अमळनेर : जळगाव जिल्ह्यात सध्या मे हिटचा (May Heat) कहर सुरु आहे. वाढत्या तापमानामुळे सूर्य आग ओकत असल्याचे चित्र असून जीवाची लाहीलाही होत आहे. अशात अमळनेरातील तांबेपुरा भागातील विवाहित महिलेचा उष्माघाताने बळी (Sun Stroke) गेल्याची घटना घडली.
रुपाली गजेंद्रसिंग राजपूत (३३) असे मयत महिलेचे नाव असून, त्या अमरावती येथे विवाह सोहळ्यानिमित्त गेल्या होत्या. त्या ११ रोजी सायंकाळी रेल्वेने अमळनेरला परत आल्यानंतर ऊन लागल्याने त्यांना अचानक मळमळ व उलट्या सुरू झाल्या. यामुळे त्यांच्या पतीने तांबेपुरा येथेच एका खाजगी डॉक्टराना दाखवले असता त्यांनी उष्माघात असल्याचे सांगत गोळ्या औषधे देऊन प्राथमिक उपचार केले. गोळ्या औषधीने महिलेला झाले आहे. बरेही वाटले मात्र, सकाळी उठल्यानंतर विवाहीतेला पुन्हा मळमळ चक्कर सुरू झाल्याने सकाळी साडेदहा वाजता त्यांना तात्काळ रिक्षा करून शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
अमळनेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. जी.एम. पाटील यांनी महिलेचे शवविच्छेदन केले. याबाबत अमळनेर पोलिसात महिलेचे दीर दीपक राजपुत यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.