मारुंजी-बोडकेवाडी कॅनल रोडवर भंगार मालाला भीषण आग; आयटीनगरीत भीतीचे वातावरण (संग्रहित फोटो)
पिंपरी : आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी-माण परिसरातील मारुंजी-बोडकेवाडी कॅनल रस्त्यालगत साठवलेल्या भंगार मालाला शनिवारी (दि.३) दुपारी भीषण आग लागली. दुपारी अडीचच्या सुमारास लागलेल्या या आगीने अवघ्या काही वेळातच रौद्ररूप धारण केले होते. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, परिसरातील मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, दोन विद्युत खांब कोसळले आहेत.
या आगीची माहिती मिळताच हिंजवडी आयटी पार्क फेज १, फेज २ आणि एमआयडीसी अग्निशमन दलाच्या पाच बंबांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. आगीमुळे परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले होते, ज्यामुळे आयटी कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की, उष्णतेमुळे रस्त्यालगतचे दोन विद्युत खांब कोसळले. सुदैवाने, त्यावेळी तिथे कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, उघड्यावर साठवलेले ज्वलनशील भंगार आगीला पोषक ठरले.
बेकायदा भंगार साठ्याचा विळखा
हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात बेकायदा भंगार दुकाने थाटली गेली आहेत. हिंजवडी-माण रस्ता, लक्ष्मी चौक ते फेज २ आणि फेज ३ कडे जाणाऱ्या मार्गांवर पदपथापर्यंत भंगार साठवून अतिक्रमण करण्यात आले आहे. कुठे मोकळ्या जागेत तर कुठे पत्र्याच्या शेडमध्ये कोणत्याही सुरक्षा नियमांचे पालन न करता ज्वलनशील भंगार साठवले जात आहे.
प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी
या घटनेमुळे आयटी नगरीतील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केवळ आग आटोक्यात आणण्यापुरते मर्यादित न राहता, प्रशासनाने या बेकायदा भंगार व्यावसायिकांवर ठोस कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. निवासी भागात आणि मुख्य रस्त्यांवर सुरू असलेल्या या धोकादायक व्यवसायांमुळे भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सुरतच्या कापड बाजारात आग
दुसऱ्या एका घटनेत, गुजरातच्या सुरतमधील कापड बाजारात काही दिवसांपासून भीषण आग लागल्याची घटना समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील पर्वत पाटिया परिसरातील राज कापड मार्केटमध्ये आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १५ हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली.
हेदेखील वाचा : Surat Fire Incident : सुरतच्या राज टेक्सटाईल मार्केटमध्ये भीषण आग, आठव्या मजल्यापर्यंतच्या अनेक दुकानं जळून खाक






