रुग्णाला चक्क खाटेवरून नेलं रुग्णालयात; यवतमाळच्या 'या' गावात पाच दशकांपासून रस्ताच नाही (संग्रहित फोटो)
उमरखेड : यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील एका गावात गेल्या पाच दशकांपासून रस्ताच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा फटका एका ज्येष्ठ रुग्णाला बसला. रुग्णवाहिका येत नसल्याने त्या रुग्णाला चक्क खाटेवरून रुग्णालयात नेण्यात आलं. जनुना वरुडबिबी असे या गावाचे नाव आहे. या प्रकारामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे.
जनुना वरुडबिबी या गावात चिखल आणि खड्ड्यांमुळे कोणतेही वाहन पोहोचू शकत नाही. यामुळे एका वयोवृद्ध रुग्णाला वैद्यकीय उपचारासाठी तब्बल एक ते दोन किलोमीटर अंतर खाटेवरून उचलून नेण्यात आले. सदर रुग्णावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वरुडबीबी अंतर्गत जनुना हे आदिवासी समाजाचे छोटेसे गाव असून, स्वातंत्र्यानंतर 75 वर्षे उलटूनही गावाला अद्याप पक्का रस्ता नाही. पावसाळ्यात सध्याचा कच्चा रस्ता चिखलमय होतो, त्यामुळे वाहनांचा वावर शक्य होत नाही.
गेल्या दहा वर्षांत अशा परिस्थितीत अनेक गरोदर महिलांची प्रसूती रस्त्यातच झाली आहे. आजारी व्यक्तींना किंवा गरोदर महिलांना तातडीने वैद्यकीय मदत मिळवणे अशक्य झाले आहे. अशाच परिस्थितीत अलीकडे एका वृद्ध रुग्णाला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ आली.
पावसाळ्यात रस्ता होतो पूर्णतः चिखलमय
सुमारे 100 ते 150 लोकसंख्या असलेल्या गावातील रस्ता पावसाळ्यात पूर्णतः चिखलमय होतो. परिणामी, आजारी रुग्ण वा गरोदर महिलांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळणे अशक्य होते. गेल्या 10 वर्षांत अशा परिस्थितीत अनेक महिलांची रस्त्यातच प्रसूती झाली आहे. अलीकडे एका वृद्ध रुग्णाला खाटेवरून दोन किलोमीटर अंतर चिखलातून उचलत नेण्यात आले.
प्रशासनाला अनेकदा साकडे; पण…
गावकऱ्यांनी अनेकदा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना साकडे घातले, पण कोणतीच ठोस कृती झालेली नाही. ‘अशा गंभीर समस्येकडे लक्ष न देणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन कसले?’ असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. रस्त्याची मागणी जोर धरू लागली आहे.
रस्त्याअभावी अनेक खेड्यांचे हाल सुरूच
दळणवळण व्यवस्था ही देशाच्या समृद्धीचे लक्षण मानली जाते. राष्ट्रीय महामार्गानंतर समृद्धी महामार्गाचे जाळे निर्माण करण्याची सरकारची तयारी सुरू आहे. मोठ्या शहरांत आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध होत असताना देशाची प्रतिमा झगमगती वाटते. मात्र दुसरीकडे, रस्त्याअभावी अनेक खेड्यांचे हाल सुरूच आहेत. हेही वास्तव आहे.
समृद्धीच्या बाता, मात्र रस्ता चिखलातच
जनुना-वरुडविवी या अवघ्या 2 किलोमीटरच्या रस्त्याच्या दुर्दशेमुळे एका रुग्णाला चिखलातून वाट काढत खाटेवरून खासगी रुग्णालयात न्यावे लागले. शासनाच्या विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाच्या कारभाराची लक्तरं वेशीवर टांगली गेली आहेत.