कल्याण (अमजद खान) : कल्याण लोकसभा मतदार संघात विविध विकास कामांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. शीळफाटा येथील उड्डाणपूलाच्या उद्घाटना दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख सुभाष भोईर हे उपस्थित राहिल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. मात्र आपल्या परिसरात मुख्यमंत्री आले होते. त्यांच्या स्वागतासाठी गेलो होतो. या पूलाचा प्रस्ताव माझा असल्याने मी त्याठिकाणी केल्याचे सुभाष भोईर यांनी सांगितले.
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख भोईर हे २०१४ साली शिवसेनेच्या तिकीटावर कल्याण ग्रामीण भागातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी २०१९ सालच्या विधानसभा निवडणूकीत तिकीट दिले होते. मात्र त्यांची तिकीट ऐनवेळी पक्षाने कापले. त्यांच्या ऐवजी त्याठिकाणी रमेश म्हात्रे यांना तिकीट दिले होते. त्यानंतर भोईर हे राजकारणापासून थोडेफार दूरच होते. शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंडाचा झेंडा फढकविला. त्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले. ठाकरे गट आणि शिंदे गट. या दोन गटापैकी सुभाष भोईर यांनी ठाकरे गटासोबत राहणे पसंत केले आहे. ते कल्याण लोकसभा मतदार संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख आहेत. त्यांना कल्याण लोकसभेतून उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे. त्यांना लोकसभेची निवडणूक लढवायची नसली तरी कल्याण ग्रामीणमधून ठाकरे गटाकडून पुन्हा विधानसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळ्यात भोईर उपस्थित राहल्याने अनेकांचा भुवया उंचावल्या आहेत. तसेच त्यांच्या विषयी तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे. मात्र भोईर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री त्याठिकाणी आल्याने त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होतो. ज्या पूलाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यानी केले. त्या पुलाचा प्रस्ताव माझा होता असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे याचा कोणी काही एक अर्थ काढू नये.