छत्रपती संभाजीनगर – आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच राजकीय वर्तुळामध्ये (maharashtra politics) चर्चेचे कारण बनणारे अल्पसंख्यांक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तरुण गोंधळ घालत असल्यामुळे सत्तार यांनी वादग्रस्त विधान (Controversial statement) केले.
या कार्यक्रमावेळी अब्दुल सत्तार पोलिसांना सूचना देत म्हणाले की, “यांना कुत्र्यासारखं मारा…१ हजार पोलिसांना ५० हजार लोकांना मारायला काय लागतं. यांच्या XXX हड्डी तुटली पाहिजे. गोंधळ घालणाऱ्यांना जेलमध्ये टाका,” त्यांच्या या वक्तव्यामुळेच विरोधकांनी टीकेची झोड उठवली. या प्रकरणानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया देत लाठीचार्जच्या आदेशाचे स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी विरोधी पक्षाची लोकं पाठवून कार्यक्रम उधळण्याचा कट होता त्या लोकांना कंट्रोल करण्यासाठी ग्रामीण भागातील बोलीमध्ये मी असे बोललो असे स्पष्टीकरण देत मंत्री सत्तार यांनी दिलगिरी व्यक्त केली.
कार्यक्रम उधळण्याचा कट
याबाबत बोलताना मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, “कालच्या कार्यक्रमासाठी साठ ते पासष्ट हजार लोक आले होते. यामध्ये विरोधी पक्षाने काही त्यांची लोक पाठवली होती. त्या लोकांकडून गोंधळ घालून कार्यक्रम उधळण्याचा कट होता आखण्यात आला होता. त्या लोकांना कंट्रोल करण्यासाठी ग्रामीण भागातील बोलीमध्ये मी बोललो आहे.”
मी दिलगिरी व्यक्त करतो
“याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका-कुशंका निर्माण झाली असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी देखील व्यक्त करतो. कालच्या कार्यक्रमामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांनी केलेली हुल्लडबाजी भविष्यात करु नये अशी विनंती.या कार्यक्रमामध्ये आलेली हजारो लोकं सुरक्षित आपल्या घरी जावेत व परिस्थिती कंट्रोल मध्ये रहावी यासाठी काही शब्दांचा वापर केला आहे. माझी सर्वांना विनंती आहे की अशा हुल्लडबाज लोकांना पाठवून असा प्रकार करु नये.” अशा शब्दांमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत विरोधकांना सुनावले आहे.