फोटो सौजन्य - एक्स (ट्वीटर)
मुंबई : सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्ये विधानपरिषदेमध्ये शाब्दिक वादातून शिवीगाळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे व भाजप नेते प्रसाद लाड यांच्यामध्ये मोठी खडाजंगी झाली. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत टीकास्त्र डागले. या संपूर्ण प्रकरणावर प्रसाद लाड यांनी अंबादास दानवे यांच्या चौकशीची मागणी करत त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे.
विधीमंडळामध्ये झालेल्या प्रकारानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणावरुन भाजप आक्रमक झाले असून मुंबईमध्ये कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन देखील केली आहे. यावर आता भाजप नेते प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसाद लाड म्हणाले, “ज्या पद्धतीने अंबादास दानवेंनी माझ्या आई बहिणीचा उच्चार केला हे चुकीचं असल्याचं ते म्हणाले. विरोधी पक्षनेत्यांना हे किती योग्य वाटतं याचा विचार करायला पाहिजे. मी स्वतः किती बहादूर आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न दानवेंनी केला, आम्ही सुद्धा लालबाग परळमध्ये मोठे झालो आहोत, माझ्या आईला दिलेल्या शिव्या मला दुःख झालं. मी रात्रभर झोपू शकलो नाही. “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर हे टाकलं असल्याचे लाड यांनी सांगितले आहे.
पुढे ते म्हणाले, “विरोधी पक्षनेत्यांवर कारवाई झाली पाहिजे, आणि त्यांनी माझी माफी मागितली पाहिजे. आरोपीला अहंकार असेल तर तो कमी झाला पाहिजे. दानवेंना शिक्षा झाली पाहिजे असं म्हणत त्यांच्या राजीनाम्याची मागणी लाड यांनी केली आहे, उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात दानवेंना जाब विचारायला पाहिजे,” अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे.