सोलापूर शहरात एसीचा स्फोट, महिलेचा होरपळून मृत्यू
सोलापूर : सोलापूर शहरात भीषण घटनेत एका महिलेचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जुन्या विडी घरकुल परिसरातील गाडगी नगर येथे शनिवारी पहाटे ही घटना घडली. पल्लवी प्रवीण सग्गम (वय ४०) असे मृत महिलेचे नाव असून, घरातील एसीचा स्फोट होऊन शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे पल्लवी सग्गम घरीच होत्या. अचानक मोठा आवाज झाला आणि काही क्षणांतच संपूर्ण घर धुराने व ज्वाळांनी वेढले गेले. स्थानिकांनी तात्काळ ओरडून शेजाऱ्यांना बोलावले. नागरिकांनी अग्निशामक दलाला माहिती दिल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. पहाटे घडलेल्या या घटनेने स्थानिक नागरिक भयभीत झाले होते. आगीमुळे घरातील फर्निचर, कपडे, घरगुती वस्तू यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच विज वितरण कंपनीचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले व वीज पुरवठा बंद करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पल्लवी सग्गम यांचा अकस्मात झालेल्या मृत्यूमुळे गाडगी नगर परिसरात शोकाकुल वातावरण होते. शेजारी व नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू
दुसऱ्या एका घटनेत, बीएसएनएलच्या इन्स्पेक्शन चेंबरमध्ये ऑप्टिकल फायबरचे काम करताना गुदमरून तीन कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात आणि त्यांच्या कुटुंबात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना शुक्रवार (दि. १५) रोजी दुपारी सेक्टर क्रमांक २७, प्लॉट क्रमांक ६५ समोर रस्त्याच्या कडेला असलेल्या बीएसएनएलच्या चेंबरमध्ये घडली आहे. मृतांमध्ये दत्ता होलारे, लखन धावरे (दोघे रा. गुरुद्वारा चौक, आकुर्डी) आणि साहेबराव गिरसेप (रा. बिजलीनगर) यांचा समावेश आहे.