मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग घेऊन गावे आत्मनिर्भर करावीत (Photo Credit @Jaykumar_Gore (X.com)
सोलापूर : ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागात केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामविकास विभागाने या वर्षापासून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी तसेच नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन गावे आत्मनिर्भर करावीत, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, आमदार देवेंद्र कोठे, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, सोलापूरच्या सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, व्यापारी आणि लोकप्रतिनिधींच्या विमानसेवेच्या दीर्घकालीन मागणीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये “उडान” योजनेअंतर्गत व्हायाबिलिटी गॅप फडिंगची तरतुद करुन सोलापूर-पुणे-मुंबई विमानसेवा सुरु करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. हा निर्णय सोलापूरच्या औद्योगिक, व्यापारी आणि पर्यटन सेवा क्षेत्राला नवी दिशा देणारा आहे.
तसेच ग्रामविकास विभागाच्या वतीने रक्षाबंधनाचे औचित्य साधून सोलापूर जिल्ह्यात उमेद अंतर्गत 14 कोटी रुपये थेट महिला बचत गटांच्या बँक खात्यावर वितरित करण्यात आले. आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन जिल्ह्यात मोठया प्रमाणावर लखपती दीदी निर्माण होतील. श्री क्षेत्र संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी, अरण तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी १५० कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर यांचे भव्य स्मारक उभारणीसाठी शासनाची कृष्ण तलावाची जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे, अशी माहिती पालकमंत्री गोरे यांनी दिली.
पंढरपूर शहरामध्ये आषाढी वारीच्या अनुषंगाने स्वच्छतेचे नवीन आयाम निश्चित केले. त्याच धर्तीवर स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर हे अभियान आजपासून एक वर्षासाठी घोषीत करीत आहे. या अभियानामध्ये सर्व घटकांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा. तसेच सोलापूर शहराच्या सन २०५७ पर्यंतच्या पाणी गरजांचा विचार करून महाराष्ट्र राज्य नगरोत्थान योजनेअंतर्गत ‘सोलापूर सिटी वॉटर सप्लाय स्कीमला’ शासनाने तत्त्वतः मंजुरी दिली आहे.