कारवाई तर होणारच! सचिन अहिर यांच्या पक्षांतरानंतर आदित्य ठाकरेंचा इशारा
सचिन अहिर यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशानंतर ठाकरे सेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. आदित्य ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर सचिन अहिर यांच्यावर कोणती कारवाई केली जाणार, याबाबत आता चर्चा सुरू झाल्या आहेत. “पक्षांतराबाबत योग्य अशी कारवाई असेल ती आम्ही निश्चितपणे करणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
सचिन अहिर यांच्या शिंदे सेनेच्या प्रवेशाबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ” ज्या जवळच्या लोकांना पक्षाकडून सर्वकाही मिळतं, तेच स्वतःच्या स्वार्थासाठी निघून जातात. त्यामुळे आता धक्का बसण्यासारखं काहीही राहिलेलं नाही. वरळी आणि शिवडी हे आमचे बालेकिल्ले आहेत. तिथे आम्ही सातत्याने कामही केलं आहे. त्यामुळे आता कोणाच्या जाण्याने आम्हाला धक्का बसत नाही.
सत्ताधारी गटावर निशाणा साधताना निशाणा साधला. “अजून काय पाहिजे होतं तुम्हाला, अजून किती ओरबाडणार आहात? इतकी पदं देऊनही अजून काय हवंय? आपल्या मंदिरांना लुटणाऱ्यांसोबतच तुम्ही कसे बसू शकता. ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचं आहे, त्यांच्यासोबत तुम्ही कसे जाऊ शकता?” असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.
“या सगळ्या पक्षांतराचा आम्ही अभ्यास केला. हे ‘ऑपरेशन टायगर’ नसून ‘ऑपरेशन देवेंद्र फडणवीस’ आहे आणि त्याचाच हा परिणाम आहे,” असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला. सचिन अहिर यांच्या उपसभापती पदाबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी भाजपचाच एखादा कार्यकर्ता का निवडला गेला नाही, याचा भाजपने विचार करायला हवा, गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे अनेक कार्यकर्ते पक्षासाठी काम करत आहेत. त्यांना का कोणतेही मोठे पद मिळत नाही, असा सवालही त्यांनी भाजपला केला आहे.
सचिन अहिर हे केवळ शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेतेच नव्हते, तर मुंबईतील, विशेषतः वरळी भागातील आदित्य ठाकरे यांच्या राजकारणातील एक प्रमुख रणनीतिकार म्हणूनही ओळखले जात होते. जेव्हा आदित्य ठाकरे यांनी २०१९ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली, तेव्हा वरळीची संपूर्ण निवडणुकीची जबाबदारी अहिर यांच्याकडे देण्यात आली होती. त्यावेळी अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला. राजकीय विश्लेषकांच्या मते, अहिर यांच्या जाण्यामुळे वरळीतील आदित्य ठाकरे यांच्या राजकीय प्रभावावर परिणाम होऊ शकतो.






