Top Marathi News Today Live : नेपाळमध्ये जलप्रलय; हजारो लोक गेले वाहून
PM Modi 80th Independence Day Speech Red Fort : देश आज आपला ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने साजरा करत आहे. या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून संपूर्ण देशाला संबोधित केले. त्यांनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र श्रद्धांजली वाहिली.
यंदाचा स्वातंत्र्यदिन अत्यंत ऐतिहासिक ठरला, कारण लाल किल्ल्याच्या प्रांगणात पहिल्यांदाच ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रगीत गायले गेले. आपल्या दीर्घ भाषणात पंतप्रधानांनी देशाच्या विकासाचा रोडमॅप मांडत तरुण, शिक्षण, सुरक्षा आणि क्रीडा क्षेत्रासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.
15 Aug 2026 05:59 PM (IST)
युरोपातील प्रमुख देश असलेल्या इटलीमध्ये सध्या एक मोठा राजकीय बदल घडताना दिसत आहे. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि उजव्या विचारसरणीच्या नेत्या जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांच्या सरकारविरुद्ध इटलीतील तरुण पिढी, विशेषतः ‘जनरेशन झेड’ (Gen Z) आणि ३५ वर्षांखालील मतदारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. राजकीय सर्वेक्षणांनुसार, सत्तेवर आल्यापासून मेलोनी यांच्या धोरणांमुळे तरुण वर्ग त्यांच्यापासून दुरावत चालला आहे. आगामी २०२७ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा ट्रेंड अत्यंत निर्णायक ठरू शकतो, कारण देशातील तरुण मतदार आता राजकीय समीकरणे बदलण्याच्या तयारीत आहेत.
15 Aug 2026 05:52 PM (IST)
रत्नागिरी-पावस मार्गावर भाट्ये येथील झरी विनायकजवळील चढावावर शनिवारी सकाळी दोन एसटी बस आणि एका कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या दोन एसटी बस समोरासमोर धडकल्यानंतर त्यांच्या मागून येणारी कारही एका एसटी बसवर आदळल्याने अपघाताची तीव्रता वाढली.
15 Aug 2026 05:45 PM (IST)
राज्याच्या राजकारणात सध्या धामधुमीचे वातावरण असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रोजच खडाजंगी होत असल्याचे चित्र आहे. राजनेत्यांकडून आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी एकमेकांवर झाडल्या जात असून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले असल्याचे दिसत आहे. अश्यातच आता मोठी बातमी समोर येत असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय भूमिकेबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत होते आणि त्यासाठी त्यांनी मंत्रिपदाची अट ठेवली होती, असा दावा चव्हाण यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
15 Aug 2026 04:47 PM (IST)
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमामुळे राज्याच्या प्रशासनाला युवा पिढीच्या नव्या दृष्टिकोनासह नावीन्यपूर्ण कल्पना आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. फेलोशिपच्या माध्यमातून मिळालेल्या अनुभवाचा उपयोग करून फेलोंनी आपल्या कार्यक्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडवावे, असे आवाहनही त्यांनी केले. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाच्या ॲप्रिसिएशन आणि नवीन बॅचच्या कमेन्समेंट कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अर्थ व सांख्यिकी आयुक्त डॉ. ज्योत्स्ना पडियार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, आयआयटीचे प्राध्यापक, कार्यक्रमाचे समन्वयक आणि सीएम फेलोज उपस्थित होते.
15 Aug 2026 04:37 PM (IST)
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी स्वतंत्र आणि हक्काची पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आणि ऐतिहासिक टप्पा गाठला गेला आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या नेतृत्वाखालील पाठपुराव्याला यश आले असून, पोलीस मुख्यालयासाठी शासनाकडून ५० एकर (२० हेक्टर) जमीन मंजूर केली आहे. मावळ-मुळशी तालुक्यातील ताथवडे येथील ‘वाळुंजमाता क्षेत्र’ अंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या अखत्यारीत असलेली २० हेक्टर जागा पोलीस मुख्यालय, परेड ग्राऊंड आणि इतर सुविधांसाठी हस्तांतरित करण्यास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. १३ ऑगस्ट रोजी ही जागा अधिकृतपणे पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या स्वाधीन करण्यात आली.
15 Aug 2026 04:27 PM (IST)
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत सुमारे साडेतीन हजार आरोग्यसेविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. किमान वेतन कायद्यानुसार पात्र ठरणाऱ्या आरोग्यसेविकांना २०१४ पासून किमान वेतन लागू करण्यासह मागील ११ वर्षांची थकबाकी मिळण्याचा मार्ग उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोकळा झाला आहे. या थकबाकीपोटी महापालिकेवर सुमारे ३०० कोटी रुपयांचा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर...
15 Aug 2026 04:17 PM (IST)
डोंबिवलीत स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘हर घर तिरंगा’ रॅलीने लक्ष वेधून घेतले आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि १०० हून अधिक सामाजिक संस्थांच्या संयुक्त पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात अनुपस्थित राहिल्याचे दिसून आल्याने राजकीय चर्चेला सुरुवात झाली. विशेष म्हणजे शिवसेना आणि भाजप हे राज्यातील महायुतीचे घटक पक्ष आहेत. त्यामुळे महायुतीतील एका घटक पक्षाच्या प्रमुख कार्यक्रमात दुसऱ्या घटक पक्षाची संघटनात्मक उपस्थिती नसल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली.
15 Aug 2026 04:02 PM (IST)
काँग्रेसच्या प्रदेश मुख्यालय असलेल्या टिळक भवन येथे ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचा दाखला देत सपकाळ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर जोरदार टीका केली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशाला मोठा संघर्ष करावा लागला. मात्र, या स्वातंत्र्य चळवळीशी ज्यांचा संबंध नव्हता, त्याच शक्ती आज देश आणि राज्याच्या सत्तेत आहेत, असा आरोप सपकाळ यांनी केला. संविधान न मानणाऱ्या आणि पूर्वी तिरंग्याला विरोध करणाऱ्या शक्तींनी स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाबाबत देशाची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
15 Aug 2026 04:00 PM (IST)
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर एक दिवस आधी मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकण भवनाची तिरंग्याच्या रोषणाईने आकर्षक सजावट करण्यात आली. सायंकाळ होताच संपूर्ण कोकण भवन भगवा, पांढरा आणि हिरव्या रंगाच्या विद्युत रोषणाईने उजळून निघाले.
15 Aug 2026 03:55 PM (IST)
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मावळ तसेच मुळशी तालुक्यातील दहा गावांतील सिंचन तसेच औद्योगिक क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या कासारसाई धरणाला आकर्षक अशी तिरंगा रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यावेळी कासारसाई धरणाच्या सांडव्यावरून पाणी सोडण्यात आल्याने ही तिरंगा विद्युत रोषणाई पाहण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत.
15 Aug 2026 03:45 PM (IST)
Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या शुभप्रसंगी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्याच्या प्राचीरवरून राष्ट्रध्वज फडकवतात. या ऐतिहासिक क्षणावर संपूर्ण देशाच्या नजरा खिळलेल्या असतात. २१ तोफांचा गडगडाट आणि राष्ट्रगीताच्या सुरांमध्ये जेव्हा तिरंगा आकाशात डौलाने फडकत असतो.
15 Aug 2026 03:30 PM (IST)
Austrelia Vs Bangladesh Test Live Updates: डार्विनमध्ये सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश या दोन संघांमध्ये टेस्ट सिरिज खेळवली जात आहे. पहिल्या टेस्ट मॅचचा दूसरा दिवस पूर्ण झाला आहे. दुसऱ्या दिवशीचा खेळ झाल्यावर बांग्लादेशच्या संघाने ऑस्ट्रेलियावर पकड मिळवली आहे.
15 Aug 2026 03:15 PM (IST)
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी स्वतंत्र आणि हक्काची पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आणि ऐतिहासिक टप्पा गाठला गेला आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या नेतृत्वाखालील पाठपुराव्याला यश आले असून, पोलीस मुख्यालयासाठी शासनाकडून ५० एकर (२० हेक्टर) जमीन मंजूर केली आहे.
15 Aug 2026 03:01 PM (IST)
सांगली : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभरात मोठ्या उत्साहाचे वातावरण असतानाच सांगलीमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे उर्फ भिडे गुरुजी हे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.
15 Aug 2026 02:59 PM (IST)
हिंगोलीत जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात शक्तिपीठ महामार्गाविरोधात कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी करण्याचा प्रकार झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहाचा शेतकऱ्यांनी ताबा घेतला. आक्रमक शेतकऱ्यांसमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कॅबिनेटमध्ये चर्चा करतो, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र चर्चा न केल्याने शेतकरी संतप्त झाले होते.
15 Aug 2026 02:49 PM (IST)
महाराष्ट्राच्या मागच्या पिढीने आणि या पिढीने मोठ्या प्रमाणात दुष्काळ बघितला. पण महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही. मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुके असतील या ठिकाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये पाणी आणून महाराष्ट्राला कायम दुष्काळ मुक्त करण्याचा आपला प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. देवेंद्र फडणवीस यांनी देशाच्या स्वातंत्र्यदिनी राज्याला संबोधित केले. महाराष्ट्र देशाचे स्टार्टअप कॅपिटल झाले आहे.
15 Aug 2026 02:40 PM (IST)
अमेरिका अन् इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या होर्मुजच्या सामुद्रधुनीला अमेरिका लवकरच स्वतःचे क्षेत्र म्हणून घोषित केले जाईल, असे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. न्यूयॉर्क स्टेटमधील एका पोलिस अकादमीत आयोजित रॅलीदरम्यान त्यांनी ही घोषणा केली. यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली असून आखातात याचे तीव्र पडसात उमटण्याची शक्यता आहे.
15 Aug 2026 02:31 PM (IST)
देशाच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यभरात उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, तर बीडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी फडणवीस यांनी महाराष्ट्राची पुढील पिढी दुष्काळमुक्त पाहण्याचा संकल्प व्यक्त केला.
15 Aug 2026 02:20 PM (IST)
पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रकृती अचानक खालावली. अशक्तपणा, चक्कर, ताप आणि मळमळ असा त्रास जाणवू लागल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवले जात आहे.
15 Aug 2026 02:08 PM (IST)
चाकण औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांच्या समस्या आणि वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सरकारने 14 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीत पोलीस आयुक्तांसह प्रमुख अधिकारी आहेत. समस्या सोडवणे, नियोजन, मंजुरी आणि अंमलबजावणीची जबाबदारी समितीवर असून, 10 महिन्यांत काम पूर्ण करायचे आहे.
15 Aug 2026 02:00 PM (IST)
राज्यासह देशभरात अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, दररोज अनेकांना अपघातामध्ये जीव गमवावा लागत आहे. अशातच आता देवळा-नाशिक रोडवरील गायत्री नर्सरीसमोर गुरुवारी (दि. १३) रात्री सव्वादहाच्या सुमारास एसटी बसने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अंबादास यशवंत कुवर (३०, रा. अजंग वडेल, ता. मालेगाव), भरत फकीरा पवार (१७, रा. सोमपूर, ता. सटाणा) आणि मनोहर प्रकाश वाघ (३०, रा. नवी बेज, ता. कळवण) अशी मृतांची नावे आहेत.
15 Aug 2026 01:55 PM (IST)
देशभरात आज 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात आहे. राजधानी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयातही स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा खासदार राहुल गांधी यांनी, स्वातंत्र्य ही केवळ भेट नसून मोठी जबाबदार आहे, असं म्हणत देशवासियांना एक खास संदेश दिला आहे. काँग्रेस मुख्यालयाच्या ध्वजारोहण समारंभात बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “राहुल गांधी यांनीही देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्य हे स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेले केवळ एक उपहार नसून ती एक मोठी जबाबदारी आहे.
15 Aug 2026 01:50 PM (IST)
राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कंबरदुखीमुळे पतीला जवळ येण्यास नकार दिल्याच्या रागातून पतीने पत्नीचा गळा दाबून तसेच चाकूने कंबरेवर आणि बगलेवर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना वाकड येथे घडली आहे. पत्नीला वाचवण्यासाठी आलेल्या मुलीवरही चाकूने वार झाल्याने ती जखमी झाली आहे. याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, तिचा पती कृष्णाजी विश्वनाथ सोमवंशी (वय ३५, रा. भाऊसाहेब कलाटे गल्ली नं. १, दत्तमंदिर रोड, वाकड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
15 Aug 2026 01:45 PM (IST)
शहरातील वाढती वाहतूककोंडी कमी करण्याबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाला नवी दिशा देण्याची क्षमता असलेला पुणे रिंग रोड आता आकार घेत आहे. या प्रकल्पाचे काम जवळपास अर्धे पूर्ण झाले असून, दोन वर्षांत हा प्रकल्प पुण्याच्या वेगवान विकासाचा मार्ग ठरण्याची खात्री देत आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगा, दऱ्या आणि सपाट भूभागातून जाणाऱ्या या मार्गासाठी उंच वायडक्ट्स आणि बोगद्यांची उभारणी केली जात आहे. त्यामुळे पुण्याच्या पायाभूत सुविधांच्या विस्तारातील हा महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे.
15 Aug 2026 01:35 PM (IST)
भारत आज आपला ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे आणि या ऐतिहासिक प्रसंगी, श्रीलंकेतील गॉल येथे कसोटी सामना खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने एक उल्लेखनीय विक्रम रचला आहे. ६०० किंवा त्याहून अधिक कसोटी सामने खेळणारा भारत जगात तिसरा देश ठरला आहे. यासह, टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या नावावर असलेल्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
15 Aug 2026 01:30 PM (IST)
भारत देश आज आपला ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. स्वातंत्र्यदिनी देशभरात तिरंगा फडकवला जात असून देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघानेही हा विशेष दिवस अविस्मरणीय पद्धतीने साजरा केला. गॉल येथे श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ एकत्र जमला आणि त्यांनी तिरंगा फडकवला.बीसीसीआयने या विशेष क्षणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून आहे.
15 Aug 2026 01:25 PM (IST)
तंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीने (CJP) आजपासून ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची सुरुवात केली. CJPचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आपल्या मूळ गावी हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पाहणी करून या अभियानाला सुरुवात केली. ध्वजारोहणानंतर दीपके यांनी गावातील शाळेला भेट देत पाहणी केली. या पाहणीदरम्यान वर्गांच्या फुटलेल्या खिडक्या आणि अस्वच्छ शौचालये आणि त्यांची दुरावस्था दिसून आली.
15 Aug 2026 01:15 PM (IST)
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पती-पत्नीच्या वादातून धक्कादायक घटना समोर आली आहे. रोटी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तव्याने डोक्यावर वार केल्याने एका ऑटोचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, दोघांचा घटस्फोट झाला होता की नाही, यावरून मृताच्या कुटुंबीय आणि आरोपी महिलेच्या दाव्यांमध्ये विरोधाभास आहे.
15 Aug 2026 01:00 PM (IST)
देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला पण या स्वातंत्र्य चळवळीत ज्या शक्तींचा काडीचाही संबंध नाही त्याच शक्ती आज देशात व राज्यात सत्तेवर आहेत. या शक्ती संविधान मानत नाहीत व राष्ट्रध्वज तिरंग्यालाही अनेक वर्ष विरोध केला. स्वातंत्र्य चळवळीत आपला सहभाग नव्हता याबद्दल या शक्तींनी देशाची माफी मागावी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संविधान स्विकारावे व संघाची नोंदणी करून संघाला देणगी कोण देते, याचा हिशोब देशाला द्यावा, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
15 Aug 2026 11:50 AM (IST)
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत ब्रिटिश राजवटीतून मुक्त झाला आणि देशाने एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून नवीन प्रवासाला सुरुवात केली. मात्र, स्वातंत्र्याच्या वेळी भारताचा संपूर्ण सध्याचा भूभाग भारतीय संघराज्याचा भाग नव्हता. गोवा, दमण आणि दीव यांसारख्या काही भागांवर परकीय सत्तांचे नियंत्रण कायम होते. यापैकी गोव्यावर पोर्तुगीजांचे शासन सर्वात प्रदीर्घ काळ टिकून राहिले. याच कारणामुळे भारताला स्वातंत्र्य मिळूनही गोवा तातडीने भारतीय संघराज्यात सामील होऊ शकला नाही.
15 Aug 2026 11:40 AM (IST)
भारत देशाला स्वातंत्र्य होऊन ८० वर्षे झाली. देशभरात आज जल्लोषाचं वातावरण आहे. स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे. या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून अनेक मोठ्या घोषणा केल्या. या सगळ्यात पेट्रोल आणि डिझेलबाबतही एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ही बातमी सामान्यांसाठी दिलासा देणार आहे. सरकारने पेट्रोल, डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) वरील निर्यात शुल्क कमी ( Petrol-Diesel Export Duty ) केले आहे. म्हणजे पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये फरक पडणार का? या निर्णयामुळे काय बदल होणार?
15 Aug 2026 11:30 AM (IST)
सोशल मीडियावर सध्या ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’शी संबंधित एक मजेशीर व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर फिरत आहे. या क्लिपमध्ये जेठालाल आणि बबीताजी चक्क लग्नाच्या मंडपात दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यांचा विवाह अगदी साऊथ इंडियन पद्धतीने दाखवण्यात आला आहे. दोघेही एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालताना दिसतात. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून अनेक चाहत्यांना काही क्षणांसाठी हे खरं आहे की काय, असा प्रश्न पडला.
15 Aug 2026 11:20 AM (IST)
टेक कंपनी गूगलने अखेर त्यांची नेक्स्ट-जनरेशन Google Pixel 11 स्मार्टफोन सिरीज भारतात लाँच केली आहे. कंपनीने या स्मार्टफोन सिरीजअंतर्गत पिक्सेल 11, पिक्सेल 11 प्रो आणि पिक्सेल 11 प्रो एक्सएल हे स्मार्टफोन्स सादर केले आहेत. दमदार फीचर्स आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह कंपनीने हे स्मार्टफोन्स सादर केले आहेत. कंपनीचे हे स्मार्टफोन्स प्रिमियम प्राईज रेंजमध्ये सादर करण्यात आले आहेत.
15 Aug 2026 11:10 AM (IST)
१५ ऑगस्ट १९४७ रोजी जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा देशातील उच्च शिक्षणाचा विस्तार आजच्या तुलनेत अत्यंत मर्यादित होता. शिक्षण मंत्रालयाच्या कागदपत्रांनुसार, स्वातंत्र्याच्या वेळी देशात केवळ २० विद्यापीठे आणि सुमारे ५०० कॉलेजेस होती. त्या काळात उच्च शिक्षण हे प्रामुख्याने निवडक शहरे आणि विशिष्ट संस्थांपर्यंतच मर्यादित होते. मात्र स्वातंत्र्यानंतरच्या काळात सरकारांनी विद्यापीठे, महाविद्यालये आणि तांत्रिक संस्थांचे जाळे सातत्याने विस्तारले, ज्यामुळे उच्च शिक्षण अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकले.
15 Aug 2026 11:00 AM (IST)
भारताचा स्वातंत्र्यता दिन 2026 च्या निमित्ताने सर्च इंजिन गूगलने एक खास डूडल तयार केले आहे. या खास डूडलमध्ये गूगलने त्यांचा लोगो देशाच्या पारंपारिक कपड्याने डिझाईन केला आहे. या डिझाईनमध्ये वेगवेगळे रंग आणि वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी कपडे पाहायला मिळत आहेत. गूगलने हे डूडल भारताचा स्वातंत्र्यता दिन 2026 चा उत्साह साजरा करण्यासाठी सादर केले आहे.
15 Aug 2026 10:50 AM (IST)
वाहतूक पोलिसांकडून प्राधान्याने ‘ई-चलन मशीन’द्वारे करण्यात येणाऱ्या कारवाईलाच पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी ब्रेक लावला असून, पोलिसांना फक्त वाहतूक नियमन करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी सर्व ई-चलन मशीन वाहतूक मुख्यालयात जमा करण्याचेही आदेश दिले आहेत. शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि प्राणघातक अपघातांना आळा घालण्यासाठी ही निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
15 Aug 2026 10:40 AM (IST)
अवघ्या एक महिन्यावर मुंबईचा गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. पवित्र मास श्रावणाचा आरंभ झाला असून श्रावणी शनिवार, सोमवार, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा आणि गोकुळाष्टमी पूर्वीच मुंबईकरांना वेध लागले आहे ते भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीचे, आपल्या लाडक्या बाप्पाच्या मंगल मूर्ती गणरायाच्या आगमनाचे मुंबईतील गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा जपत तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट, लालबाग यंदा आपल्या हीरक महोत्सवी वर्षांत गणेशोत्सवाचे भव्य आयोजन करीत आहे. या ऐतिहासिक वर्षाचे विशेष आकर्षण ठरणार आहे ते म्हणजे कागदाच्या लगदयापासून साकारण्यात आलेली २२ फूट उंच पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे. यंदाची भव्य गणेशमूर्ती मूर्तिकार राजन झाड यांच्या संकल्पना आणि कलाकौशल्यातून साकारण्यात येत आहे.
15 Aug 2026 10:30 AM (IST)
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील शैक्षणिक संबंध आता अधिक घट्ट होत आहेत. ऑस्ट्रेलियातील काही नामांकित विद्यापीठांचे कॅम्पस भारतात सुरू झाले आहेत, तर काही येण्याच्या तयारीत आहेत. अशा स्थितीत, जे भारतीय विद्यार्थी थेट ऑस्ट्रेलियाला जाऊन उच्च शिक्षण घेण्याचा विचार करत आहेत आणि अशा कोर्सच्या शोधात आहेत ज्यानंतर लगेचच नोकरी मिळेल, त्यांच्यासाठी ‘अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन अँड केअर’ (Early Childhood Education and Care) हा एक उत्तम पर्याय ठरत आहे.
15 Aug 2026 10:20 AM (IST)
माउंटेन व्यू-बेस्ड टेक दिग्गज कंपनी गूगलने भारतासह दुसऱ्या ग्लोबल मार्केटमध्ये Google Pixel 11 Pro Fold लाँच केला आहे. पावरफुल फीचर्स, आकर्षक डिझाईन आणि इतर दमदार स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज असलेला हा बहुप्रितिक्षित स्मार्टफोन आता अखेर भारतात लाँच करण्यात आला आहे. या फोल्डेबल डिव्हाईससोबतच कंपनीने गुगल पिक्सेल 11, पिक्सेल 11 प्रो, पिक्सेल 11 प्रो एक्सएल आणि पिक्सेल वॉच 5 देखील लाँच केले आहे.
15 Aug 2026 10:10 AM (IST)
मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप बांधण्यासाठी परवानगी मिळवणे सोपे व्हावे, यासाठी बीएमसीने यावर्षीही ऑनलाईन सिंगल विंडो प्रणाली सुरू केली आहे. तात्पुरत्या मंडपांच्या परवानगीसाठीची ऑनलाईन प्रणाली शुक्रवार, १४ ऑगस्टपासून महानगरपालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी तात्पुरते मंडप बांधण्याची परवानगी देण्यासाठी बीएमसीच्या वेबसाईटवर संगणकीकृत प्रणाली लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बीएमसीच्या https://portal.mcgm.gov.in या वेबसाईटवरील ‘नागरिकांसाठी मंडप (सार्वजनिक गणेशोत्सव/नवरात्री उत्सव इतर उत्सव)’ या सुविधेद्वारे मंडप परवानगीसाठी अर्ज सादर करणे आवश्यक आहे
15 Aug 2026 10:00 AM (IST)
भारतात 15 ऑगस्ट रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 15,288 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,014 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,466 रुपये आहे. भारतात 15 ऑगस्ट रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,40,140 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,52,880 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,14,660 रुपये आहे. भारतात 15 ऑगस्ट रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 254.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,54,900 रुपये आहे.
15 Aug 2026 09:42 AM (IST)
School Thik Karo Campaign Start from Today: कॉकरोच जनता पार्टीचे आजपासून (15 ऑगस्ट) ‘स्कूल ठिक करो’ मोहिमेला सुरुवात होत आहे. सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी या मोहिमेची घोषणा केली होती. त्या मोहिमेअंतर्गत अभिजीत दिपकें, सौरव दास, आशुतोष रांका यांच्यासह सीजेपीचे सर्व सदस्य पहिल्या टप्प्यात आपापल्या गावी जाऊन ग्रामीण भागातील शाळा दुरुस्त करण्याची मागणी करणार आहेत. त्यानंतर देशभरातील ग्रामीण भागात फिरून शाळा दुरुस्तीची ही मोहिम राबवली जाणार आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दोन-तीन दिवसांपूर्वीच अभिजीत दिपके यांनी ग्रामीण भागातील सरकारी शाळांच्या दुरावस्थेवरून कॉकरोच जनता पार्टीसाठी अभिजीत दिपके यांनी सरकार आणि प्रशासनाला धारेवर धरले आहे. सीजेपीच्या माध्यमातून आता ग्रामीण शिक्षण व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी आता ‘स्कूल ठीक करो’ या विशेष अभियानाची घोषणा केली आहे.
15 Aug 2026 09:41 AM (IST)
Independence Day: आजचा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन असून हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस आहे. आज भारताने इंग्रजांच्या दीर्घकालीन गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवले, हा दिवस भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पहिल्यांदा तिरंगा फडकवला आणि आपल्या ऐतिहासिक भाषणात देशाला स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून दिले. या स्वातंत्र्याच्या लढ्यात महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यांच्यासह असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या जीवनाचं बलिदान दिलं. वाचा सविस्तर-
15 Aug 2026 09:39 AM (IST)
Independence Day Medals 2026: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरातील पोलीस, अग्निशमन, नागरी संरक्षण, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १ हजार ५७ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर केली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ८२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कर्तव्यावर असताना जीवित आणि सार्वजनिक, खासगी मालमत्तेचे रक्षण करणे, गुन्हे रोखणे आणि गुन्हेगारांना अटक करताना दाखवलेल्या असामान्य शौर्याबद्दल शौर्य पदक दिले जाते. यंदा देशभरात ३०१ शौर्य पदके जाहीर झाली आहेत. त्यात २७२ पोलीस आणि २९ अग्निशमन सेवा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातील २० पोलीस कर्मचारी आणि १३ अग्निशमन सेवा कर्मचाऱ्यांचा शौर्य पदकाने सन्मान करण्यात येणार आहे.






