Photo Credit- Social Media आदित्य ठाकरे २०२९ मध्ये मुख्यमंत्री होणार ! ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचे सूचक विधान
संभाजीनगर: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) ने लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीतही जोरदार कामगिरीची अपेक्षा ठेवली होती. मात्र, महायुतीने विधानसभेत कमबॅक करत महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला. पण, ठाकरे गटाने आता महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष केंद्रित करत ठाकरे गटाने तयारी युद्धपातळीवर सुरू केली आहे. विशेषत: राज्यातील चार प्रमुख महानगरपालिकांवर फोकस करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे माजी मंत्री चंद्रकांत खेरे यांनी सूचक विधान केलं आहे.
२०२९ मध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडणूका होतील, आणि आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार. असे भाकीत छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी वर्तवलं आहे. जालन्यात एका लग्न समारंभात भेट देण्यासाठी आलेले असतांना, खैरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी २०२९ साली भाजपचे अध:पतन होऊन, शिवसेना सत्तेत येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. रावसाहेब दानवेंनी सिग्मा हॉस्पिटलमध्ये बसून माझा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव केला. असा आरोप खैरे यांनी केला. आमच्याच नगरसेवक आणि नेत्याला पैसे देऊन दानवेंनी मला पराभूत केले. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत दानवेंना देवाने जालन्यात पराभूत केले. असा टोला खैरे यांनी रावसाहेब दानवे यांना लगावला. मैदान पुढे आहे आम्ही पुन्हा परत येणार, असा इशारा देखील खैरे यांनी भाजपला दिला आहे.
Kirit Somaiya Threat: ‘आम्ही याच्या घरी जाऊ, जे करायचं ते करू…’; किरीट सोमय्यांना थेट धमकी
राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असून, या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः मुंबई, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या चार महत्त्वाच्या महापालिकांवर ठाकरे गटाचे लक्ष केंद्रित आहे. सध्या या सर्वच महापालिकांमध्ये प्रशासकांकडून कारभार चालविला जात आहे.या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) या चारही महापालिकांमध्ये ताकद लावून काम करण्याच्या तयारीत आहे. येत्या निवडणुकीत या महापालिकांवर वर्चस्व मिळवण्यासाठी विशेष नियोजन केले जात असून, त्यासाठी काही नेते व उपनेत्यांवर स्वतंत्र जबाबदाऱ्या सोपवण्यात येणार आहेत.
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये Indigo चे इमर्जन्सी लॅंडींग; नेमके कारण
येत्या मंगळवारी ठाकरे गटाची एक महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीत आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी रणनीती ठरवली जाणार आहे. त्यात नेते व उपनेत्यांना महानगरपालिकानिहाय जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत. बैठकीनंतर जबाबदारीचे अधिकृत वाटप केले जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या हालचालींमुळे आगामी निवडणुकीसाठी ठाकरे गटाची तयारी जोरात सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे.