पुणे : कोंढवा भागात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका अफ्रिकन नागरिकाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून तब्बल साडेचार लाखांचे मेथक्यूलॉन आणि एमडी हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. अमली पदार्थ विरोधी पथक दोनने ही कारवाई केली.
अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल
कोंम्बो कारमेलो मयेले (वय २७, रा. हांडेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, योगेश मांढरे व त्यांच्या पथकाने केली आहे.
अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश
शहरातील वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासोबतच सराईतांवर आणि अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्या आहेत. यादरम्यान, अमली पदार्थ विरोधी पथक दोनचे वरिष्ठ निरीक्षक सुनिल थोपटे व त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. तेव्हा माहिती मिळाली की, एक परदेशी व्यक्ती कोंढव्यातील शोभा करनेशन सोसायटी तालाब समोरील सार्वजनिक रोडवर मेफेड्रोन व मेथक्यूलॉन हा अमली पदार्थ विक्रीकरिता येणार आहे. या माहितीची खातरजमा करण्यात आली. तसेच, पथकाने सापळा रचला. संशयित व्यक्ती दिसताच पथकाने त्याला पकडले.
पोलिसांकडून तपास सुरू
त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ २ लाख ५८ हजार रुपये किमतीचा १२ ग्रॅम ८३५ मिलिग्रॅम मेथक्यूलॉन हा अमली पदार्थ तसेच १ लाख ४२ हजार रुपये किमतीचा ७ ग्राम ७५ मिलिग्राम मेफेड्रोन (एमडी) हा अंमली पदार्थ आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर तो हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याने हा अमली पदार्थ कोठून आणला तसेच तो कोणाला विक्री करणार होता, याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
आफ्रिका देशीतील अंगोला येथील रहिवासी
कोम्बो हा मुळचा आफ्रिका देशीतील अंगोला येथील आहे. सध्या तो हांडेवाडी भागातील जाधवनगर येथील गणराज सोसायटी येथे भाड्याने राहत होता. त्याचा व्हिझा व इतर माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.