विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि रोजगार हमी तसेच फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्यात भर बैठकीत जोरदार भांडण झाले असून ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याच नुकतंच पाहायला मिळालं.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि रोजगार हमी तसेच फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्यात भर बैठकीत जोरदार भांडण झाले असून ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याच नुकतंच पाहायला मिळालं. औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हे दोन नेते आपसात भिडले. निधीवाटपावरून दोन नेत्यांमध्ये झालेल्या वादाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. विरोधी पक्षातील आमदारांना पालकमंत्र्यांकडून निधी मिळत नसल्याचा, तसेच कमी निधी दिला जात असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. यावर औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनीही चढ्या आवाजात प्रत्युत्तर दिलं. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बाचाबाची झाली.
या वादानंतर पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की ठाकरे गटाच्या निधीबद्दल बोलण्यापेक्षा तालुक्यांना किती निधी दिला ते महत्त्वाचं आहे. प्रत्येक तालुक्याला किती निधी दिला ते पाहा. जितका निधी वैजापूर, सिल्लोड आणि गंगापूर या तीन तालुक्यांना दिला तितकाच निधी कन्नड तालुक्यालाही दिला आहे. सगळ्या तालुक्यांना सारखा निधी दिला आहे.
दरम्यान, संदीपान भुमरे यांच्यापाठोपाठ अंबादास दानवे यांनीदेखील प्रसारमाध्यमांशी बातचित केली. अंबादास दानवे म्हणाले, जिल्हा नियोजन मंडळ म्हणजे स्वतःची जहागिरी असल्यासारखे जर पालकमंत्री वागत असतील तर त्यांच्याविरोधात आवाज उठवलाच पाहिजे. ती माझी एकट्याची भूमिका नव्हती. सत्ताधारी आमदारांनाही तसंच वाटत होतं. मी त्यांचीही भूमिका मांडली. आमदार रमेश बोरनारे, अब्दुल सत्तार, अतुल सावे, हरीभाऊ बागडे नाना या सगळ्याच आमदारांना तसं वाटत होतं. मी फक्त ती भूमिका आक्रमकपणे मांडली. ते (पालकमंत्री) तुम्हाला म्हणतील की आम्ही सगळ्या तालुक्यांना सारखाच निधी दिला आहे. परंतु तालुक्यांमधील लोकसंख्येच्या निकषावर निधीचं वाटप होत असतं.
नेमकं प्रकरण काय?
पालकमंत्री संदीपान भुमरे निधी देत नाहीत, असा आरोप कन्नड मतदारसंघाचे आमदार उदयसिंह राजपूत (ठाकरे गट) केला होता. याच मुद्द्यावरून अंबादास दानवे आक्रमक झाले. त्यामुळे भुमरे आणि दानवे यांच्यात वाद झाला. निधीवाटपाचा मुद्दा दानवे यांनी आक्रमकपणे मांडला. त्यावर औरंगाबादचे पालकमंत्री आणि शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांनीही प्रत्युत्तर दिलं. यावेळी अंबादास दानवे हे संदीपान भुमरे यांच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर भुमरेही मोठ्या आवाजात दानवेंना प्रत्युत्तर देत होते.
Web Title: After the meeting with sandipan bhumre and ambadas danve gave reply nrab