फोटो सौजन्य: Gemini
Ahilyanagar News: शेवगाव आणि पाथर्डीला गारपीटीने झोडपले; शेतकरी मोठ्या संकटात
अवैध धंदे आणि दारूच्या व्यसनापायी गावातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. सततच्या भांडणापायी ग्रामपंचायतीने राजूर येथील अवैध धंदे बंद करण्यासोबतच परिसरातील अवैध दारू विक्री बंद करण्याचा ठराव घेतला. मात्र राजूर पोलिस आणि दारू उत्पादन शुल्क विभागाच्या वरदहस्तामुळे गावातील अवैध दारू विक्रीसोबतच गुटका, जुगार, ताडी यासारखे अवैध धंदे जोमात आले आहेत. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी ग्रामसभेत अवैध दारुबंदीचा अनेकदा ठराव केला. तसेच अवैध दारु विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राजूर पोलिस ठाण्याचा उंबरठा झिजवला आहे. सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, दारुबंदी कार्यकर्ते आता मोठे आंदोलन छेडण्याच्या तयारी आहेत. राजूर गावातील भर बाजारपेठेसह दिंगबर रोड, ग्रामपंचायत कार्यालयामागे अवैध दारू विक्री केली जाते.
अवैध दारु विक्रेते, गुटका व रेती तस्करासोबतचे पोलिस अधिकाऱ्यांचे मैत्रीपूर्ण संबंध सामान्य नागरिकांना खटकणारे आहेत. गावात चाललेल्या अवैध धंद्यांना आळा घालण्याऐवजी चालना मिळत असल्याने मुख्य सुत्रधार कोण?, कुणाकुणाचे संगनमत आहे?, याबाबत संशय व्यक्त होत आहे. वारंवार पोलिसांचे लक्ष वेधूनही फारसा काही उपयोग होताना दिसत नाही. या व्यावसायांना अंकुश लावण्यासाठी सामाजिक संघटनांसोबतच ग्रामस्थांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे.
अनेकांचे संसार वाचविण्यासाठी राजूर ग्रामपंचायतने अनेकदा मासिक सभेत अवैध धंदे आणि दारूबंदीसाठी ठराव केला. सरपंच, ग्रामसचिव आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या या ठरावाची प्रत राजूर पोलिस स्टेशनला देण्यात आली. मात्र, पोलिसांकडून अद्याप उपाययोजना झाल्या नाहीत. याउलट गावातील अवैध व्यावसायिकांची पोलिस प्रशासनाकडून पाठराखण केली जात आहे. अवैध दारू विक्री करणाऱ्यासह पोलिसांच्या मोबाईलवरील संभाषणाची चौकशी होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर राजूर पोलिस ठाण्यात अवैध व्यवसायिकांची नेहमीच वर्दळ असते. त्याचे चित्रण सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे दिसत आहे.






