संग्रहित फोटो
पुणे : दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या एअर इंडियाच्या प्रवासी विमानाला शुक्रवारी पक्ष्याची धडक बसल्याची घटना घडली. विमानाला धडक होऊनही वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान पुणे विमानतळावर सुखरूपपणे उतरविले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. ही घटना विमान पुण्याच्या हद्दीत असतानाच घडली आहे.
हवेत पक्ष्यांची उपस्थिती ही अनेकदा विमानांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरते, याचे हे आणखी एक उदाहरण आहे. एअर इंडियाच्या या फ्लाइटमध्ये सुमारे १५० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. विमान सुरक्षित उतरल्यानंतर विमानाची तपासणी करण्यात आली असून, संबंधित तांत्रिक पथकांनी आवश्यक कार्यवाही केली आहे.
विमान प्रवासाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह?
पक्ष्याच्या धडकेमुळे विमान सेवा सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा घटना वारंवार घडत असल्याने विमानतळ परिसरात पक्ष्यांची संख्या का वाढते आहे, यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. यापूर्वीही पुणे विमानतळावर अशा घटना घडल्या आहेत. याचा फटका खुद्द नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांना देखील यापूर्वी बसला आहे. पक्ष्यांच्या घिरट्या, या पुणे विमानतळासाठी डोकेदुखी ठरत असल्या तरीही त्यावर अद्याप तोडगा निघाला नसल्याचेच हे द्योतक आहे.
अहमदबाद अपघाताचा धडा घेणार नाही का ?
अहमदाबाद विमान अपघातानंतर ‘डीजीसीए’ ने विमान संचालन दरम्यान नियमांची कडक अंमलबजावणी सुरु केली आहे. विमान उड्डाण आणि लँडिंग दरम्यान पक्ष्यांचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे विमानतळ परिसरात स्वच्छता, उघड्यावर कचरा टाकणे, अन्नपदार्थांचा साठा अशा गोष्टींवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. ‘डीजीसीए’ ने अशा घटना संदर्भात विमानतळ प्रशासनाला देखील जबाबदार धरणे गरजेचे आहे.