मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (Rashtrawadi Congress) अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार पडलेल्या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. शरद पवार यांनी त्यावेळी अनेक नेत्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या. पण या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचं नाव नव्हतं. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. दुसरीकडे अजित पवार यांच्याकडे विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची (Opposition Party Leader) जबाबदारी असल्याने त्यांना पक्षाची संघटनात्मक जबाबदारी देण्यात आलेली नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. पण आता स्वत: अजित पवार यांनी याबाबतची मागणी केली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी नको
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुंबईत आज कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात भाषण करताना अजित पवार यांनी आपली इच्छा व्यक्त केली. यावेळी त्यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी नको. तर पक्षाच्या संघटनात्मक बांधणी विषयी जबाबदारी द्या. आपल्याला कोणतीही जबाबदारी मिळाली तरी आपण तिला न्याय देण्याचा प्रयत्न करु, असं अजित पवार भर कार्यक्रमात म्हणाले आहेत.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
“मला विरोधी पक्षनेत्यामध्ये फार काही इंटरेस्ट नव्हता. पण आमदारांनी आग्रह केला. त्यांनी सह्या केल्या. नेतेमंडळींनी देखील सांगितलं की तू विरोधी पक्षनेता होता. त्यामुळे मी त्यांच्याखातर या पदाची जबाबदारी घेतली. मी एक वर्ष विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सांभाळली आहे. ते सांभाळत असताना काहींचं म्हणणं आहे की, तू कडक वागत नाही. आता त्यांची गचोडी धरु का? पण आता बस झालं”, असं अजित पवार म्हणाले.
“मला त्यातून मुक्त करा आणि संघटनेची जबाबदारी द्या. मग कशापद्धतीने पक्ष चालतो ते बघा. अर्थात हा नेतेमंडळींचा अधिकार आहे. पण माझी इच्छा आहे. बाकी अनेकजण वेगवेगळ्या इच्छा व्यक्त करतात. मी आज माझी इच्छा व्यक्त केली आहे. आजपर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी पार पाडलेली आहे. मला संघटनेत कोणतंही पद द्या. तुम्हाला जे पद योग्य वाटेल ते द्या. त्या पदाला योग्य न्याय मिळवून देईन”, असं अजित पवार म्हणाले.