अजित पवारांनी देहूत घेतले जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे दर्शन
पुणे, शहर प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आणि श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात बुधवारी दर्शन घेतले. यावेळी आमदार सुनील शेळके, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प वैभव महाराज मोरे, ह.भ.प दिलीप महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह.भ.प.उमेश महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे आदी उपस्थित होते. दर्शनानंतर संस्थानच्यावतीने पवार यांचा सत्कार करण्यात आला.
टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात चिंब झालेले वारकरी, ‘ज्ञानोबा माऊली’, ‘माऊली, माऊली’ चा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी अशा भक्तिमय वातावरणात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखीचे आज (१८ जून) देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे यांनी पालखी सोहळ्याबाबत माहिती दिली आहे. यंदाचा ३४० वा पालखी सोहळा आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्यावतीने पालखी प्रस्थानाची तयारी पूर्ण झाली आहे. चांदीच्या रथाला उजाळा देण्यात आला असून रथाला आठ कॅमेरे लावण्यात आले आहेत.
इनामदार वाड्यात पालखी पहिला मुक्काम असेल. कोरोना महारामारीचे पालखी सोहळ्यावरही पडसाद उमटले होते. पण कोरोनाची साथ ओसरल्यानंतर मागील वर्षापासून पुन्हा एकदा पारंपरिक पद्धतीने वारी सुरू करण्यात आली.
Beed Crime: मुलीच्या लग्नाचं स्वप्न अपूरचं राहिलं…! बापाने मल्टिस्टेट बँकेच्या गेटवर आयुष्य संपवलं
दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पालखी मार्गांसंबधी माहिती दिली होती. येत्या वर्षभरात पालखी मार्गाचे काम पूर्ण केले जाईल. पुण्यातील देहू आणि आळंदी येथून पंढरपूरला जाणाऱ्या पालखी मार्गांची हवाई पाहणी केली. तसेच, पालखी मार्गावरील दुपदरी रस्त्यांचे चौपदरीकरण केले जात आहे. वारकऱ्यांचे पाय भाजू नयेत, याची काळजी घेतली जात आहे. या पालखी मार्गांवर ज्ञानेश्वरीत उल्लेख करण्यात आलेले वृक्ष लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असंही गडकरी यांनी नमुद केलं होतं.